(चिपळूण)
कराड-चिपळूण महामार्गावर असणाऱ्या कुंभार्ली चेक पोस्ट येथे नाकाबंदीवेळी अवैध गुरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी बुधवारी ( दिनांक 22/01/2025 रोजी) मध्यरात्री पावणे एक वाजता पकडला. या ट्रकमध्ये आखुड दोरीने बांधून ठेवलेली एकूण २२ जनावरे भरलेली सापडली. या प्रकरणी ट्रक चालक शहाजी शंकर नलवडे याच्यावर आलोरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीवरून तेथील पोलीस अंमलदार यांनी येणार्या-जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करत होते. या दरम्यान एक अशोक लेलंड ट्रक क्रमांक MH-50-4480 हा चिपळूणहून कराडकडे जात असताना पोलिसांना ट्रक पाहून संशय आला. तत्काळ ट्रकला थांबवून चालकाकडे चौकशी करण्यात आली. गाडीच्या हौद्यामध्ये दाटीवाटीने व आखुड दोरीने बांधून ठेवलेली एकूण २२ जनावरे भरलेली सापडली.
अलोरे पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ०३/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण १९७६ चे कलम ५(ए)(१),९ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१), (घ), (ङ), (च), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ व मो.वा.का. कलम ६६ / १९२ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक जप्त करून ट्रक चालक शहाजी शंकर नलवडे (वय- 52 वर्ष रा -जखीनवाडी कृष्णा हाँस्पीटल शेजारी ता कराड जिल्हा सातारा) याला अटक करण्यात आली आहे. तसेच या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.
एका दिवसाची पोलीस कोठडी
मा. न्यायालय चिपळूण यांच्याकडे संशयित आरोपीला हजर केले असता त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. या गुन्ह्यातील इतर ३ संशयितांचा शोध सुरू असून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करण्यात येत आहे. ट्रकमद्ये सापडलेली एकूण २२ जनावरांपैकी एकही जनावर दगावलेले नाही, सर्व जनावरे सुरक्षितरित्या गोशाळेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. यासोबत सर्व जनावरांची पशुवैद्यकीय अधिकारी चिपळूण यांच्यामार्फत वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे.