(नवी दिल्ली)
भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना पुष्पांजली वाहिली. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधानांनी ध्वजारोहण केलं, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली.
लाल किल्ल्यावरील भाषणादरम्याम पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं. ‘ नैसर्गिक संकटांमुळे आपल्या सगळ्यांची चिंता वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपली जवळची माणस गमावली आहेत. आज मी त्या सर्वांबद्दल संवेदना व्यक्त करतो. मी त्यांना विश्वासाने सांगतो, हा देश संकटकाळात त्यांच्यासोबत आहे’, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तरुणांना नवं वचन दिलं. ते म्हणाले की, आता आपल्या मध्यमवर्गीय तरुणांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागणार नाही. पुढील पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येतील
पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून महिलांविरोधात बलात्काराच्या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. राज्य सरकारने महिला होणारे गुन्हे गांभीर्याने घेण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, मुलींवर अत्याचार होत आहेत. दोषींमध्ये भीती निर्माण करणं गरजेचं आहे.
भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विकासाच्या मॉडेलचा उल्लेख केला. आमच्या सुधारणांचा मार्ग हा विकासाचा राजमार्ग आहे. या सुधारणा फक्त उच्चशिक्षीत किंवा बुद्धिवादी वर्गासाठी सीमित नाहीत. आम्ही राजकीय समीकरणांचा विचार करुन कोणत्याही सुधारणा राबवत नाही अथवा धोरणे ठरवत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हीच प्राथमिकता आहे. आमचा भारत महान व्हावा, हाच संकल्प मनात ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.