(मुंबई)
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला आता या पराभवाची कारणमीमांसा करणार असून पदाधिका-यांची झाडाझडती घेणार आहेत. येत्या १७ तारखेला नागपूर येथे पक्षाचे नवनिर्वाचित आमदार तसेच पराभूत उमेदवार यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेणार घेत कोणत्या कारणाने पक्षाला एवढ्या मोठ्या पराभवाला सामोरे जायला लागले याची करणे शोधून काढणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने महाविकास आघाडी मधून १०१ जागा लढविल्या होत्या. मात्र त्यापैकी केवळ १६ जागांवरच त्यांना यश मिळविता आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासारख्यांना मोठ्या नेत्यांना देखील पराभव पत्करावा लागला. आता या मानहानीकारक पराभवाचे पडसाद पक्षात उमटायला सुरूवात झाली आहे. विधिमंडळ अधिवेशन तोंडावर असताना काँग्रेसला अद्याप विधिमंडळ गटनेता निवडता आलेला नाही. उद्यापासून नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आता झाडाझडती सुरू होणार आहे.
दरम्यान, रमेश चेन्नीथा यांनी १७ तारखेला काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार, विधान परिषद सदस्य व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे सर्व उमेदवार यांच्याशी नागपूरमध्ये चर्चा करणार आहेत. नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात ही चर्चा होणार असून सकाळी ११ वाजता आमदारांशी तर दुपारी १ वाजता विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. नागपूर येथे होत असलेल्या या महत्वपूर्ण चर्चेला संबंधित सर्वांनी उपस्थित रहावे, असे निर्देश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.