(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी हातखंबा रस्त्यावरील टीआरपी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ ) सकाळी नऊ वाजता भीषण अपघात झाला. या डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जणांना चिरडले यात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. मुक्तेश्वर सहदेव ठीक (58, रा प्रशांतनगर रत्नागिरी) व राघो कृष्णा धुरी (68,रा साईनगर रत्नागिरी) अशी दोघांची नावे आहेत. मुक्तेश्वर हे महावितरण चे कर्मचारी होते.
रत्नागिरी ते हातखंबा मार्गावर दिवस-रात्र प्रचंड वर्दळ असते. सकाळच्या सुमारास गाव-खेड्यातील नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी शहरात येत असतात. यातच सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने सर्वच भागातील रस्ते एकाच वेळी खोदल्याने रस्त्यावरील प्रवास वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. ठेकेदार कंपनीचा मनमानी कारभार कशा पद्धतीने सुरू आहे हेच या अपघातातून उघड होत आहे. या अपघातात निष्पाप बळी घेणारा डंपर ( क्रमांक MH08H 2292) हा रवी इन्फ्राबिल्ड या ठेकेदार कंपनीचा नसून तो रत्नागिरीतील एका खाजगी व्यवसायिकाचा आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.
मात्र खोदलेल्या रस्त्यावर डंपर- दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकी चालक राघो धुरी यांच्या डोक्यावरून डंपरचा टायर गेल्याने डोक्याचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. तर मागे बसलेल्या मुक्तेश्वर ठीक यांच्याही डोक्याला जबर मार लागला यात या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी दाखल झाले. डंपर चालकाने दुचाकीला धक्का दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र घटनास्थळीवरील अपघाताची दृश्य ही भीषणता जाणवून देत आहे. रुग्णवाहिकेतून दोघांचेही मृतदेह रत्नागिरी शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. बळी घेणाऱ्या डंपर चालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीवर अनेक सवाल नागरिकांमधून उपस्थित करून आपला संताप व्यक्त करीत आहे. तसेच जबाबदार डंपर चालकावर कठोरात कठोर शिक्षा करून डंपर मालकाकडून मृतांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी अशी ही मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. अपघाताबाबत पोलिस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
रुंदीकरणाच्या कामामुळे सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण
मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. ठेकेदार कंपनीने ठिकठिकाणी खोदाई करून ठेवल्यामुळे या धोकादायक महामार्गावर कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. मात्र याबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे. वाहनचालकांसह नागरिकांना सकाळ, दुपार, संध्याकाळ धुळीच्या समस्येने ग्रासले आहे. या मार्गावर छोटे-मोठे अपघात देखील होत असतात. सुरू असलेल्या कामामुळे सर्व्हिस रोडची अक्षरशः चाळण झाली आहे. हातखंबा ते रत्नागिरी हा १३ किमीचा रस्ता पार करण्यासाठी पंधरा मिनिटा ऐवजी पाऊण तास लागत आहे. १३ किमीचे अंतर म्हणजे वाहन चालकांसाठी वेदना देणारे ठरत आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी या मार्गाने नेत असतांना तो रुग्णालयापर्यंत सुरक्षित पोहचेल किंवा नाही याबाबत शंकाच आहे. महामार्ग संबंधित सुरक्षिततेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्राधिकरण विभागाचे अधिकारी एसीच्या गाड्यांमधून फिरून नेमके कोणते निरीक्षण करतात. हाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.