(संगमेश्वर / एजाज पटेल)
केंद्र व राज्य शासनाकडून गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम, अभियान राबवण्यात येत आहेत. काही अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर काही अभियान कागदोपत्रीच पार पडली जातात. स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू करण्यात आले होते. मात्र, तालुक्यामध्ये सध्या या मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. गावपातळीवरचे तंटे थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहचत आहेत.
गावातील किरकोळ वाद-तंटे गावातच सामोपचाराने मिटवण्याच्या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी 2007साली राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाची सुरुवात केली होती. या अभियानामुळे गावागावातील तंटे कमी झाले होते. तर गावांमध्ये नेमलेल्या समित्याही जोमाने काम करीत होत्या. मात्र, शासनाने या समित्यांकडे दुर्लक्ष केले असल्याने संगमेश्वर तालुक्यातील गावांमधील तंटामुक्ती समित्या फक्त पाट्या लावण्यापुरत्याच उरल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भाग हा विकासाच्या वाटेवर आहे. भाव भावकीत उद्भवणारे तंटे सोडवण्यासाठी तंटामुक्ती समिती नेमण्यावर भर दिला जात होता. गावातील छोटे-मोठे तंटे पोलिस ठाण्यात जाण्या अगोदरच मिटावेत. तसेच गावपातळीवर एकोपा निर्माण होऊन जातीय सलोखा कायम ठेवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
ग्रामपातळीवरील तंटामुक्त समित्या गठित करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांची निवड केली होती. त्यानंतर या मोहिमेला गावागावातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने पोलिसांवरचा ताण कमी होऊन जातीय सलोखा राखला जाऊ लागला होता. मात्र, सध्या या अभियानाकडे शासनाने पाठ फिरवल्याने केवळ समित्या नावालाच उरल्या असून सरकारी अनास्थेमुळे समित्यांचे अस्तित्व शिल्लक राहिलेले नसल्याचे दिसत आहे.
गावागावात शांता व सलोखा टिकून यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवले जात होते. मात्र सद्यस्थितीत या दोन्ही अभियानाला घरघर लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्वच्छता व तंटामुक्त हे दोन्ही उपक्रम सामाजिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे अभियान आहेत. दोन्ही अभियान एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने गावात शांतता, एकोपा दिसत होता, पण परिस्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे ते योग्य राबविणे, शांततामय वातावरण निर्मिती करण्यासाठी व सुंदर गावाची संकल्पना करण्यासाठी ही दोन्ही समाजोपयोगी अभियान राबवली पाहिजेत.
गावागावात समिती कागदोपत्रीच
तंटामुक्त गाव अभियान समिती गावागावात स्थापन करण्यात आली. परंतु, तंटामुक्त समितीच्या सभेला फक्त 4-5 सदस्य उपस्थित असतात, तर अनेक गावात केवळ कागदोपत्रीच तंटामुक्ती समिती राहिली आहे.
नव्या समित्या निर्माण करण्याची गरज
गाव जर खरंच तंटामुक्त व्हावे, अशी प्रशासन व राज्यकर्त्यांची भूमिका असेल, तर पुन्हा गावागावांत तंटामुक्त ग्राम समितीचे नवे स्वरूप निर्माण करणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासन, स्थानिक प्राधिकरण यांचा मेळ घालून प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, तलाठी, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींच्या सहभागाची गरज आहे.
तक्रार निवारण अभावी परिस्थिती गंभीर
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावात समितीची स्थापना केली जात होती. समितीच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, लहान-मोठे तंटे, एकमेकांत झालेला वाद, शेतीचा वाद गाव पातळीवरील समितीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जात होता. गावातील तक्रारीचे निवारण गावातच होत असल्यामुळे तंटे पोलिस ठाण्यापर्यंत कधीही जात नव्हते. पण आता रोज गावातील भांडण पोलिस ठाण्यात येत आहेत