(रत्नागिरी)
इको व्हॅनमधून विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्या तिघांवर लांजा पोलिसांनी कारवाई करताना कारसह गावठी हातभट्टीची दारू असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास देवधे फाटा येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची खबर लांजा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी देवधे मार्गावर सायंकाळी सापळा रचला होता. सायंकाळी ७.१५ च्या सुमारास जाणारी इको कार (एम एच ०१ ए व्ही ६३४९) ही पोलिसांनी थांबविली असता या कारमध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा आढळून आला. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची कारमधून वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारमधील गौरव नंदकुमार चव्हाण (३७ वर्षे, रा. मिरजोळे जांभूळ फाटा ता. रत्नागिरी) तसेच शिवजीत सुनील पाटील (रा. मिरजोळे पाटीलवाडी ता. रत्नागिरी) आणि बाळकृष्ण वामनसे (रा. झापडे ता. लांजा) या तिघांना ताब्यात घेतले. तसेच वापरण्यात आलेली मारुती सुझुकी इको कार (किंमत २ लाख ३० हजार) आणि गावठी हातभट्टीची दारू २०० लिटर (किंमत २० हजार २५० रुपये) असा एकूण २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकी प्रकरणी पोलिसांनी या तिघाही जणांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र कांबळे हे करत आहेत.