(रत्नागिरी)
रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम लोकसभा निवडणुकीनंतर मंदावले आहे. पावसामुळे हातखंबा ते खेडशी मार्ग हा खड्ड्यात गेला आहे. तसेच संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खन ते कळकदरा या भागात चिखलमिश्रित माती रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्गावर वेळीच उपाययोजना करुन अपघात रोखावेत, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे. परंतु ठेकेदार कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे त्या महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी देखील डोळेझाक करून आंधळेपणा करत आहे.
रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे काम हाती घेऊन वर्षभराहुन अधिक काळ लोटला आहे. रेल्वे स्टेशन परिसरात दोन्ही मार्गिकेचे काम अर्धवट करून तशाच स्थितीत ठेवण्यात आले आहे. यामुळे येथील रस्ता अरुंद झाला आहे. खेडशी ते हातखंबा भागात अजूनही एक मार्गिका पूर्ण झालेली नाही. रत्नागिरीतील मिऱ्या येथून या कामाला सुरुवात करण्यात आली. या महामार्गासाठी ठिकठिकाणी डोंगर कटाई करण्यात आले आहे. चांदसूर्या येथील भला मोठा डोंगर मध्यभागीं कापण्यात आला. डोंगरामधून सरळ रेषेत मार्ग करण्यात आल्याने भविष्यात या भागात डोंगरातील नरम झालेली माती रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, महामार्गावरील अनेक भागात पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असणारी माती आणि मातीची वाहतूक करणाऱ्या डम्परमधून पडणारी माती यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. तसेच डंपरमधून रस्त्यावर पडणारी माती ही दुचाकी चालकांना अपघातांना आमंत्रण देत आहे.
चिखलमय मार्गावरून प्रवास जीवघेणा…
संगमेश्वर तालुक्यातील आंबा घाटात दख्खन ते कळकदरा या भागातील संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने या भागात रस्ता निसरडा झाला आहे. घाटातील मोठ्या प्रमाणात डोंगर कापण्यात आले असून, रस्ता सपाटीकरणाचे काम सुरु आहे. या भागातून वाहने ने-आण करणे धोकादायक बनले आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे.
पर्यायी सर्व्हिस रोडही धोकादायक
महामार्गाच्या कामासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या रवी इन्फ्राबिल्ड कंपनीने याकडे वेळीच लक्ष देऊन चिखलमिश्रित माती बाजूला करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून करण्यात येत आहे. अन्यथा या मार्गावर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.