• अवजड वाहतूक कोणाच्या आदेशाने सुरू?
( रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी )
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पाच दिवसांचे गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना ५ सप्टेंबरपासून बंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या महामार्गावरील हातखंबा वाहतूक मदत केंद्राच्या समोरून बिनबोभाट अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. त्यामुळे अवजड वाहन बंदीच्या आदेशाला हातखंबा चेकपोस्ट केंद्रातील पोलिसांनी हरताळ फासला आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई, पुण्यातील चाकरमानी कोकणातील रस्त्यावर खड्ड्याचे दणके बसून हैराण झाले. या प्रवासादरम्यान काही भागात वाहतूक कोंडीचा मोठा सामना देखील करावा लागल्याने चाकरमान्यानी शासन प्रशासनावर तसेच नेत्यांवरही टीकेची झोड उठवली होती. मात्र परतीच्या प्रवासात ही आता अवजड वाहनांचा अडथळा येत असल्याने अवजड वाहनाच्या मागोमाग पंधरा ते वीस गाड्यांची मोठी रांग लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. ही सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक कोणाच्या आदेशाने सुरू आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
चार सप्टेंबरपासून चाकरमानी कोकणात दाखल झाले. पाच दिवसांच्या गणपतींचे गुरुवारी विसर्जन झाले. त्यानंतर चाकरमानी आता परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मुंबई ते गोवा महामार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी करण्यात आली आहे. यामध्ये वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा जास्त वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु गणेशोत्सव काळात १६ टनापेक्षा कमी आणि जास्त वजन क्षमता असलेली वाहने हातखंबा चेकपोस्ट नाक्यातील पोलिसांच्या समोरून सर्रास ये-जा करीत आहे. येथील वाहतूक पोलीसांकडून अवजड वाहनाला काही तास थांबवून चालकांकडून चिरीमिरी घेतल्यानंतर अवजड वाहने सोडण्यात येत असल्याचे वाहनचालकांकडून बोलले जात आहे. तर काही वाहने येथील दुसऱ्या मार्गिकेवर थांबवून बंदी आदेशाचे पालन करीत असल्याचा एक प्रकारे दिखावा करून काही तासानंतर ती देखील अवजड वाहने सोडण्यात येत आहे. यातून निवळी, हातखंबा चरवेली घाटात या अवजड वाहनांच्या मागोमाग लांबलचक मोठ्या रांगा लागतात. प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करायची काेणी? अन् उल्लंघन होऊन अपघात घडला, तर त्याला जबाबदार कोण? असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
गणेशउत्सवाचा काळ सुरू असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर आरटीओ अधिकाऱ्यांच्या दिवस रात्र गाड्या फिरत आहेत.मार्गावरुन प्रवेशबंदी झुगारून अवजड वाहने बिनधास्त मार्गक्रमण करत आहेत. मात्र याकडे आरटीओ अधिकाऱ्यांचे ही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. हातखंबा चेकपोस्ट कार्यालयासमोरुनच अवजड वाहनांची बिनदिक्कत वाहतूक सुरू असेल तर बंदी आदेश कोणासाठी? या सर्व प्रकाराकडे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
वाहनचालकांना करावा लागतोय वाहतूक कोंडीचा सामना
मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे हातखंब्यापासून संगमेश्वर आणि रत्नागिरी चिपळूणपर्यंतचा रस्ता काही ठिकाणी एकेरी आहे. दुसऱ्या लेनचे काम सुरू आहे. एकाच लेनवरून वाहने ये-जा करीत आहेत. त्यामुळे खेरशेत, धामणी, कळंबस्ते फाटा, शास्त्रीपूल, संगमेश्वर बस स्थानक परिसर या टप्प्यात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. संगमेश्वर आणि बावनदीचा असलेला अरुंद पूल वाहतूक कोंडीसाठी मुख्य कारणीभूत ठरत आहे. या ठिकाणी ट्रक आणि कंटेनर समोरासमोर आल्यानंतर छोट्या वाहनांना पुढे जाण्यासाठी मार्ग मिळत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने वारंवार अडकून पडण्याचे प्रकार घडत आहे.