(मुंबई)
टाटा उद्योगसमुहाची धुरा सांभाळून या समुहाला जागतिक स्तरावर प्रसिद्धीत आणणाऱ्या, यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या रतन नवल टाटा यांनी बुधवारी रात्री उशिरा म्हणजेच 9 ऑक्टोबर 2024 रोडी जगाचा निरोप घेतला. ते 86 वर्षांचे होते. प्रदीर्घ आजारपणामुळं टाटांचं निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आणि नकळत साऱ्यांचेच डोळे पाणावले.
रतन टाटा यांच्याशी प्रत्यक्ष भेट घडलेल्या आणि त्यांना भेटण्याचं भाग्य न मिळालेल्या पण तरीही मनानं कायमच त्यांचा प्रचंड आदर करणाऱ्या प्रत्येकानंच या असामान्य व्यक्तिमत्त्वाचा श्रद्धांजली वाहिली. अनेकांनीच त्यांचे काही फोटो शेअर केले. या सर्व फोटोमध्ये एका पोस्टनं लक्ष वेधलं आणि डोळ्याच्या कडाही ओलावल्या.
ही खास पोस्ट होती रतन टाटा यांच्या सर्वात तरुण असिस्टंचची, म्हणजेच शांतनू नायडूची. लिंक्डइनवर त्यानं मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. रतन टाटा यांच्यासमवेत सावलीसारख्या राहिलेल्या शांतनूचा प्रत्येक शब्द मनात कालवाकालव करून जाणारा ठरला.
‘आता या मैत्रीच्या नात्यात जर काही उरलं असेल तर तो मीच आहे. मी कायमच ती पोकळी भरण्याचा प्रयत्न करत राहीन. प्रेमाची किंमत अशा वेदनांनीच फेडावी लागते. माझ्या सर्वात प्रिय, जवळच्या दिपस्तंभाला अखेरचा अलविदा…’, अशा शब्दांत शांतनूनं आपल्या या खास मित्रासाठी, रतन टाटा यांच्यासाठी पोस्ट लिहीत त्यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. त्याचे शब्द आणि ही पोस्ट सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणून गेली.
कोण आहे शांतनू नायडू?
रतन टाटा यांच्यासोबत सतत दिसणारा हा 29 वर्षीय तरुण, शांतनू नायडू त्यांचा असिस्टंट असल्याचं सांगितलं जातं. रतन टाटांनी शांतनूला कायमच एक मित्र, आपला स्वत:चा मुलगा अशीच वागणूक दिली. मे 2022 पासून शांतनूनं त्यांच्यासाठी काम करणं सुरू केलं आणि तेव्हापासून तो टाटा समुहाचा खास सदस्य ठरला. रतन टाटा यांच्या निधनानंतर शांतनूच्या मनात घर केलेल्या रितेपणाच्या भावनेनं अनेकांच मन हेलावलं, ज्यानंतर त्याला सर्वांनी आधार देण्याचाही प्रयत्न केला.