(रत्नागिरी)
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 647 वी जयंती जिल्हाभरात त्यांचे विचारपर्व म्हणून महिनाभर साजरी करण्याबाबत आवाहन जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांनी समाज बांधवांना केले. रत्नागिरी तालुक्यातील गुरु रविदास भवन जाकादेवी तरवळ येथे झालेल्या सभेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
संत रविदास यांची नुसती जयंती करून चालणार नाही, तर त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. ते आचरणात आणणे गरजेचे आहे. यासाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी जयंती उत्सव साजरा करून इतर तालुक्यातील समाज बांधवांना दुसऱ्या तालुक्यात जाऊन समाज बांधवांचे प्रबोधन करता यावे यासाठी महिनाभर वेगवेगळ्या दिवशी ही जयंती साजरी करावी असे असे आवाहन करण्यात आले.
यानुसार रत्नागिरी तालुक्यातील गुरु रविदास विकास मंडळाच्यावतीने मौजे जाकादेवी येथे हा जयंती उत्सव रविवार दिनांक 26/02/2023 रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत उपस्थित समाज बांधवांसाठी नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम जिल्हाध्यक्ष डॉ. परशुराम निवेंडकर यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन मुंबई व जिल्हा रुग्णालय रत्नागिरी यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे. तसेच सकाळी 11 वाजता गुरु रविदास महाराजांच्या प्रतिमापूजन, मान्यवरांचा सत्कार त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव मान्यवरांचे मनोगत दुपारी अल्पोपहार व संध्याकाळी महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रकाश खेडेकर, सचिव दत्ताराम मेढेकर यांनी केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी श्री. यशवंत कोतवडेकर, श्री सुहास वरेकर, श्री. जगन्नाथ फणसोपकर, सचिन चव्हाण, मयूर वरेकर, संदेश कदम, दीपक सैतवडेकर,निलेश विलकर आदी समाजबांधव व तालुका पदाधिकारी मेहनत घेत आहेत.