(गुहागर)
एस.टी. बसने विजेची सर्व्हिस वायर तोडून चक्क तीन विद्युत खांब आपल्यासोबत नेत तोडल्याचा प्रकार तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी येथे घडला. यामुळे गेले दोन दिवस कोंडवाडी अंधारात होती. चालकाच्या या बेपर्वाईमुळे येथील ग्रामस्थांनी एस.टी. प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या प्रकारामुळे महावितरणचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले असून, गुहागर आगाराला याबाबत पत्र देऊन नुकसानभरपाईची मागणी केल्याची माहिती श्रृंगारतळी महावितरणचे सहायक अभियंता मंदार शिंदे यांनी दिली.
गुहागर आगारातून गुरुवारी (दि.२०) सकाळी ११ वाजता सुटणारी गुहागर-पेवे व्हाया पाटपन्हाळे ही विद्यार्थ्यांना श्रृंगारतळी शाळेत घेऊन येणारी एसटी बस कोंडवाडी येथे आली. पाटपन्हाळे सरपंच विजय तेलगडे यांच्या घराजवळ आली असता रस्त्यावरून एका घराकडे गेलेली विजेची सर्व्हिस वायर व तिला जोडून असणारी जीआयची तार ओढत नेली. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूने उभे असलेला सिमेंटचा १ व लोखंडी २ असे ३ वीजखांब तुटले.
एवढा प्रकार घडूनही एसटी चालक न थांबता बस सुसाट घेऊन गेला. दरम्यान, यावेळी घडलेला प्रकार तेथील काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. गेले दोन दिवस कोंडवाडीतील काही घरे विजेअभावी अंधारात होती. दिवसभर मुसळधार पाऊस असूनही महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी येथे वीजखांब उभे केले व वीजपुरवठा सुरळीत केला. यामध्ये महावितरणचे सुमारे ४० हजारांचे नुकसान झाले आहे.