(लांजा)
तालुक्यातील आंजणारी स्टॉपजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एका टेम्पोची धडक कारला आणि त्या कारची धडक दुसऱ्या कारला बसली. हा अपघात मंगळवारी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास घडला असून टेम्पो रस्त्याच्या कडेला कलंडल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पनवेलहून गोव्याकडे जाणारी इनोव्हा कार (जीए ०७ ई २२६८) राजेश श्रीनिवास कामत (६३, रा. गोवा) चालवत होते. लुखमान खान (४५), चंद्रकांत कळगुटकर (५८), कुणाल झिरगे (३०, सर्व रा. गोवा) यांना घेऊन ते पनवेलहून गोव्याकडे जात होते. मंगळवारी रात्री १२:३० वाजण्याच्या दरम्यान आंजणारी थांब्यानजीक पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने (एमएच ४३ बीएक्स ७४००) इनोव्हा कारला धडक दिली.
टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने इनोव्हा कारने आपल्या पुढे असलेल्या कारला धडक दिली. ही कार पालीहून लांजाकडे जात होती. कारला धडक दिल्यानंतर टेम्पो कलंडल्याने त्यामधील चालक, क्लीनर, कामगार गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी पाली येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या विचित्र अपघातामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, अधिक तपास हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.