(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे आज (रविवारी) सायंकाळच्या सुमारास समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक व स्थानिक व्यवसायिकांना यश आले. गणपतीपुळे येथे आज सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास पर्यटकांची गर्दी झाली होती, याच दरम्यान सायंकाळच्या सुमारास जयगड येथील जेडब्ल्यू पोर्ट मरीन कंपनीचे तीन कर्मचारी सुट्टी असल्याने फिरण्यासाठी आले होते.
यावेळी समुद्रात समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी तीन जण समुद्रात उतरले असता तिघांनीही समुद्राती चाल पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न घेता खोलवर जाण्याचा प्रयत्न केला. सध्या पावसाळी महिने संपत आले असले तरी समुद्रात चाल पडलेले आहेत. तरीदेखील पर्यटक अति उत्साहाच्या भरात समुद्रात खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करतात.
ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रावरील स्वच्छतागृह इमारतीच्या समोरच्या जागेत घडली. यावेळी तिन्ही तरुणांना वाचविण्यासाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अजिंक्य रामानी, अनिकेत राजवाडकर, महेश देवरुखकर यांनी तात्काळ समुद्रात उड्या घेतल्या, त्यांच्यासमवेत स्थानिक व्यावसायिक निखिल सुर्वे व अन्य व्यावसायिक गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली व मदतीसाठी सहकार्य केले. परंतु त्यातील दोन जणांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तात्काळ मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आले. यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर एकाला वाचविण्यात वाचविण्यात स्थानिक जीवरक्षक व्यावसायिक व पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले.
या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीतआहेत. तसेच या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते.