(राजापूर)
व्हाटसॲपवर अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ओणी-गुरववाडी (ता. राजापूर) येथील एका वृद्धाला साडेपाच लाखाला लुटल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिस स्थानकात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिया शर्मा, विक्रम राठोड, राहुल शर्मा (पूर्ण नाव, गाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. या तिघांनी ओणी-गुरववाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाची फसवणूक केली आहे. या तिघांनी व्हॉट्स ॲपवर एक अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी वृद्धाला दिली. हा व्हिडीओ व्हायरल न करण्यासाठी त्यांनी वृद्धाकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या वृद्धाने बँक ऑफ इंडियाच्या ओणी शाखेतून धनादेशाद्वारे ८ मे रोजी ७० हजार, ९ मे रोजी १ लाख, १४ मे रोजी १ लाख, १७ मे रोजी २ लाख आणि २० मे रोजी ८० हजार असे एकूण ५ लाख ५० हजार इतकी रक्कम पाठवून दिली.
मात्र, त्यानंतरही धमकीद्वारे पैसे उकळण्याचा प्रकार सुरू होता. त्यानंतर त्या वृद्धाने पोलिस स्थानक गाठून याबाबत सोमवारी फिर्याद दाखल केली. त्यानंतर राजापूर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याआधीही जिल्ह्यात असे काही प्रकार घडले आहेत.