(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथे आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी माघी यात्रोत्सव मोठ्या भक्तीभावात उत्साहात पार पाडला. रविवारी 2 फेब्रुवारी रोजी दुपारी या यात्रेची “मोड यात्रा” म्हणून सांगता होणार आहे. या यात्रेनिमित्ताने स्थानिक भाविकांचा जनसागर उसळल्याचे चित्र दिसून आले.
गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात दरवर्षी माघी यात्रा ही स्थानिक भाविकांची म्हणून ओळखली जाते त्यामुळे घाटमाथ्यावरील भाविकांपेक्षा या यात्रेला स्थानिकांची मोठी उपस्थिती दिसून आली. त्यामध्ये गणपतीपुळे तीर्थक्षेत्राबरोबर नजिकच्या मालगुंड, वरची निवेंडी, भगवतीनगर ,वरवडे, नेवरे, भंडारपुळे धामणसे खंडाळा व जाकादेवी, तसेच संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातील व जिल्ह्यातील स्थानिक भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी व यात्रेच्या खरेदी निमित्ताने मोठी गर्दी केली होती. या माघी यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील अनेक दुकानदार आपली विविध वस्तूंची दुकाने घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे माघी यात्रेनिमित्त आलेल्या सर्व ठिकाणच्या भाविकांनी श्रींच्या दर्शनाबरोबरच विविध वस्तूंच्या खरेदीचा आनंद लुटला.
या माघी यात्रोत्सवाच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या वतीने स्वयंभू स्वयंभू श्रींचे मंदिर पहाटे पहाटे पाच वाजता दर्शनासाठी खुले करण्यात आले यावेळी प्रारंभी गणपती मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते पूजाअर्चा, मंत्रपुष्प व आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिरा सोडण्यात आले. यावेळी भाविकांना दर्शन योग्य प्रकारे मिळावे याकरिता संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. या दर्शन रांगांमधून स्थानिक भाविकांनी स्वयंभू श्रींचे श्रद्धापूर्वक दर्शन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभे राहून घेतले.
यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या दर्शन रांगांच्या ठिकाणी संस्थान श्री देव गणपतीपुळे चे सुरक्षारक्षक व कर्मचारी त्याचबरोबर पोलीस कर्मचारी यांनी दर्शन रांगातील भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपली कामगिरी चोख बजावली. या माघी यात्रेच्या निमित्ताने घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळाकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी माघी यात्रेमध्ये आलेल्या अनेक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचे चित्र दिसून आले.
या यात्रेच्या निमित्ताने आलेल्या भाविकांच्या वाहनांची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी रत्नागिरी येथील वाहतूक कक्षाच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचबरोबर संपूर्ण गणपतीपुळे मंदिर परिसर, समुद्र चौपाटी आणि सर्वच परिसरात भाविकांच्या नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अनुचित प्रकार रोखण्यासाठी सर्वच पोलीस कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेतली.
या माघी यात्रेच्या निमित्ताने संस्थान श्री देव गणपतीपुळे च्या वतीने सायंकाळी ठीक चार वाजता मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गे वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वयंभू श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखी मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी मंगलमूर्ती मोरया चा जयघोष करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या माघी यात्रा उत्सवामध्ये घाटमाथ्यावरील काही गणेश मंडळांकडून श्रींच्या पालख्या गणपतीपुळे येथे पायी दिंडीद्वारे दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या या पालख्यांचे दर्शन देखील अनेक भाविकांनी घेतल्याचे चित्र दिसून आले. एकूणच माघी यात्रा उत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी संस्थान श्री देव गणपतीपुळे, ग्रामपंचायत गणपतीपुळे व पोलीस यंत्रणा यांनी विशेष मेहनत घेतली.