(नवी दिल्ली)
चंदीगड महापौर-पदासाठी ३० जानेवारीला झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची ८ मते पीठासीन अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्याने भाजपचे मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार सिंग यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत पीठासीन अधिकायां वर मतपत्रिकेत छेडछाड केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
या प्रकरणावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड,न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पीठासीन अधिका-यांचा व्हिडीओ दाखवण्यात आला. पीठासीन अधिकारी मतपत्रिकेत छेडछाड करीत असल्याचे बघून ही सरळसरळ लोकशाहीची थट्टा आणि हत्या असल्याची संतप्त प्रतिक्रिया सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिली. सोबतच अशा अधिकाऱ्यावर कडक कारवाईचे तोंडी आदेशही सरन्यायाधीशांनी दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
अशा पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात का? हे पीठासीन अधिकाऱ्याचे वर्तन आहे का? अशा व्यक्तीवर कडक कारवाई व्हावी, असे न्यायालयाने म्हटले. तसेच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलमार्फत बॅलेट पेपर, व्हिडीओसह निवडणुकीचे रेकॉर्ड जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. चंदीगड महापालिकेची ७ फेब्रुवारीची बैठकही पुढे ढकलण्याचे आदेश दिले. चंडीगड महापालिकेची सदस्य संख्या ३६ आहे. त्यात भाजपचे १६, आम आदमी पक्षाचे १३, काँग्रेसचे ७, तर शिरोमणी अकाली दलाचा एक असे संख्याबळ आहे. आप आणि काँग्रेस एकत्र आल्याने या दोघांचे संख्याबळ २० झाले. त्यामुळे ‘आप’चा महापौर निवडून येणार ही केवळ औपचारिकता होती, पण ८ मते अवैध झाल्यामुळे भाजपचे उमेदवार मनोज सोनकर १६ मते मिळवून विजयी झाले.