(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरानजीकच्या एमआयडीसी येथील ऑटोसिटी कार वॉश डिटेलिंग दुकानातून चोरट्याने रोख २,५०० रुपये चोरून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीला आली. तर दुसरी घटना शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या संरक्षक भिंतीला लागून असलेल्या गॅरेजमधील दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. ही चोरी रविवारी रात्री उघडकीला आली.
एमआयडीसी चोरीप्रकरणी गौरव संजय नलावडे (२७, रा. गयाळवाडी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ही चोरी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान झाली आहे. गौरव नलावडे यांचे एमआयडीसी येथे वॉशिंग सेंटर आहे. ते मंगळवारी सकाळी दुकानात गेले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी दुकानात पाहिले असता चोरट्याने त्यांच्या दुकानातून २,५०० रुपये चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत ग्रामीण पोलिस स्थानकात माहिती दिली.
तसेच, गॅरेजमधील चोरी प्रकरणी नीलेश सुधाकर मोरे (४२, रा. मधला फगरवठार, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, त्यांची दुचाकी (एमएच ०८, एडी ५५९९) प्रमोद महाजन क्रीडा संकुलच्या बाजूलाच असलेल्या विशाल गॅरेजमध्ये ठेवण्यात आली होती. ते दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना दुचाकी सापडली नाही. गॅरेजमधून दुचाकी अज्ञाताने चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिस तपास करत आहेत. अशा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलीस प्रशासनाची गस्त घालत असतानाची नजर कमी पडत असल्याचे चित्र आहे.