उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या टंचाईमुळे, जनावरांच्या खाद्यामध्ये आकस्मिक बदल होतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना मिळेल ते खाद्य देवून त्यांची गरज भागविणे यावरच भर दिला जातो त्यामुळे त्यांना बऱ्याच वेळेस निकृष्ट प्रतिचे खाद्य दिले जाते. जनावर खाताना रवंथ करत नाहीत, त्यामुळे अपचनासारखे आजार होतात त्याकारणाने ते चारा कमी खातात किंवा पूर्णपणे बंद करतात. म्हणून दूध उत्पादनात घट होते, प्रजनन क्षमता कमी होते, वजन घटते.
अतिप्रखर सुर्यप्रकाशामुळे तडक्या सारखे चामडीचे आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जनावरांची योग्य व्यवस्थापन करुन उष्णतेचा ताण कमी करून उत्पादन टिकवून ठेवण महत्वाच असते. जनावरांचे शरिरामध्ये त्यांनी खाल्लेले अन्न, शरिरात साठविलेली चरबी व पोटामध्ये होणारी आंबवणक्रिया इत्यादी कारणांनी ऊर्जा निर्माण होते. शरीरात निर्माण झालेल्या उर्जेचा उपयोग शरिरक्रिया चालू ठेवणेसाठी होत असतो, त्याशिवाय अतिरिक्त ऊर्जा जनावराचे शरिर वाढीसाठी व दुधउत्पादन वाढीसाठी उपयोगी असते. जनावरांच्या शरीरात एकुण उत्पादीत उर्जेचा बराचसा भाग शेण, लघवी (मूत्र) किंवा वाफ वायुस्वरूपात आणि घामाव्दारे शरिराबाहेर टाकला जातो व शरिराचे तापमान नियंत्रित ठेवले जाते.
उन्हाळ्यामध्ये वातावरणातील उष्णता वाढल्यामुळ जनावरांचे शरिराचेही तापमान वाढते व हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरिरातील उष्णता शरिरक्रियेचा वेग वाढवून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरिर क्रियेवर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात. साधारणत: जनावरांचे आरोग्य चांगले असते अशावेळेस देशी गाईचे कमाल तापमान ९५° फॅ. तर म्हशींचे कमाल तापमान १०० ‘फॅ. असते.
उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अती प्रखर किरणाचा संपकांमुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता, तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या (जी.आय.सीट) पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांना एकत्र डांबून गर्दी केल्यास उष्माघात चा त्रास होऊ शकतो म्हणून त्यावर ऊसाचे पाचट किंवा इतर आच्छादन करणे गरजेचे असते.
उष्मघाताची लक्षणे
जनावर अस्वस्थ होते, जनावराची तहान-भूक मंद होते. जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६° फॅ. इतके वाढून कातडी कोरडी पडते.
जनावराचा श्वासोच्छवासाचा दर वाढून धाप लागल्यासाखे होते. जनावरांचे डोळे लालसर होवून डोळे पाणी गळतात.जनावरांना ८ तासानंतर अतिसार होतो. जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.जनावारे बसून घेतात, गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.
उपचार
जनावरास थंड पाण्याने स्वच्छ धूवुन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर थंड ठिकाणी बांधावे व हलके पाचक गुळमिश्रित खाद्य दयावे. जनावरांच्या दोन्ही शिंगाच्यामध्ये पाण्याने ओले केलेले कापड ठेवून त्यावर वारंवार थंड पाणी टाकावे. जनावरास नियमित व वारंवार (साधारणतः ३-४ वेळेस भरपूर थंड पाणी पाजावे) उष्माघात झालल्या जनावरांना डक्स्ट्राज सलाईन आवश्यकतेनुसार शिरोद्वारे द्यावे व अॅव्हीलचे इंजेक्शन १० मिली कातडी खाली द्यावे. या रोगावार कोणत्याही प्रकारच्या जुलाबरोधक औषधाचा उपयोग होत नाही.
प्रतिबंधक उपाय म्हणून जनावरांची उन्हाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी
म्हशींचा निसर्गतःच रंग काळा असतो तसेच कातडीसुद्धा जाड असते. उन्हाची तीव्रता वाढली की, ती लगेच तापते. गाई पेक्षा म्हशींमध्ये घामग्रंथीची संख्या कमी असते. त्यामुळे घामावाटे फारशी उष्णता बाहेर पडत नाही म्हणून तापलेले शरिराचे तापमान कमी किंवा थंड ठेवण्यासाठी म्हशींना पाण्यात डुबु देणे उपयुक्त ठरते.
संकरीत गाईच्या बाबतीत तर उन्हाळ्यात विशेष काळजी
जनावरांना गोठ्यामध्ये थंड जागी किंवा झाडाखाली बांधावे. गोठयाच्या छपरावर गवत, पाला पाचोळा टाकून पाणी शिंपडावे त्यामुळे गोठा थंड राहतो. उन्हाळ्यामध्ये जनावरांना ३-४ वेळा थंड पाणी पाजावे. आहारामध्ये वाढीव क्षार मिश्रणाचा वापर करावा.
जनावरांना उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये. गोठयामध्ये अधूनमधून पाणी फवारावे. रात्री व पहाटेच्या समयी वाळलेली वैरण भरपूर द्यावी. दुपारच्या प्रहरी हिरवी मका, चवळी, कडवळ, लसूण घास यासारखी पोषक वेरणा दयावी. त्यामुळे दूध उत्पादन सातत्य टिकून राहते व प्रजनन क्षमताही सुधारते. उन्हाळ्यामध्ये माजाचा कालावधी कमी असतो. बऱ्याच वेळा मुकामाज जाणवतो. म्हशीमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी थंड प्रहरी जनावरांचे बारकाईने निरिक्षण करुन माजाची लक्षणे पहाणे किंवा खच्चीकरण केलेला वळू जनावरामाग फिरवून माजावरील जनावरे ओळखता येतील. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरवता त्याऐवजी सकाळी किंवा उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर भरविल्यास गर्भधारणीचे प्रमाण वाढून जनावर उन्हाळ्यातही गाभण राहतील.
खाद्यातून अ जीवनसत्वाचा पुरवठा करण्यासाठी जास्तीत जास्त हिरवा चारा दयावा. उन्हाळयात जनावरांना लाळ खुरकत व फऱ्या या सारख्या रोगांची रोगप्रतिबंधक लस योग्य वेळी टोचून घेणे गरजचे आहे. दुभत्या जनावरांप्रमाण लहान वासर, कालवडी, पारड्या, भाकड जनावर व गाभण जनावरे यांची योग्य ती काळजी घ्यावी.
डॉ. गणेश यु. काळुसे
(विषय विशेषज्ञ, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र)
डॉ. सी. पी. जायभाये
(कार्यक्रम समन्वयक)
Source: कृषी जागरण