(मुंबई)
देशभरात चर्चेत असणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गॅंगने माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या केली. या हत्येनंतर जबाबदारी स्वीकारताना ‘जे कोणी सलमान खान आणि दाऊद गॅंगला मदत करतील, त्यांच्यासोबत अशाच प्रकारचे कृत्य केले जाईल’, असा इशारा दिला आहे. त्यामुळे सलमान खान वर असलेला बिश्नोई गँगचा राग सलमानला जीवे मारण्याच्या प्लॅनिंगमध्ये असू शकतो अशी शक्यता आहे. मात्र त्याचवेळी बिश्नोई समाजाने काही अटींवर सलमान खानला माफ करण्याची तयारी दर्शवली आहे.
अभिनेता सलमान खानला बिश्नोई गॅंगकडून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एकदा या गॅंगच्या गुंडांनी चक्क सलमानच्या बाल्कनीत गोळीबार केला होता. त्यातच आता बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर जबाबदारी स्वीकारताना केलेली पोस्ट ही सलमान खानचं टेन्शन वाढवणारी आहे. त्यामुळेच पोलिसांकडूनही आता सलमानच्या खराब बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र बिश्नोई समाजाने सलमान खान ने आपली माफी मागावी अशी मागणी केली आहे.
अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सलमान खानवर 2 काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. हे प्रकरण अजूनही न्यायालयात सुरू आहे. मात्र काळवीट मारल्या प्रकरणी सलमान खानने माफी मागितल्यास बिश्नोई समाज त्याला माफ करू शकतो. सलमान आता तरी शुद्धीवर आला असेल आणि जर त्याने आपली चूक कबूल करून माफी मागितली, तर बिश्नोई समाज त्याच्या 29 नियमांनुसार त्याला माफ करेल.’
देवेंद्र बुडिया पुढे म्हणाले की, ‘बिष्णोई समाजात अनेक नियम आहेत. या 29 नियमांमध्ये दहाव्या नियमात माफीची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीकडून चुका झाल्यास माफीची तरतूद आहे. नियमांनुसार एखाद्याने, कोणताही गुन्हा केला असेल तर त्याला दया दाखवून माफ केले जाऊ शकते. जर सलमान खानने माफी मागितली आणि त्याला क्षमा करण्याची भावना असेल तर समाज दया दाखवून माफ करेल.’
दरम्यान लॉरेन्स बिश्नोई गॅंगने अनेकदा सलमानला माफी मागण्याचं आवाहन केलं आहे. सलमानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागितल्यास त्याला माफ करण्याची तयारी बिश्नोई गॅंग ने दाखवली होती. त्यातच आता बिश्नोई महासभेच्या अध्यक्षांनीही सलमान कडे माफीची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकरण वेळीच रोखण्यासाठी सलमान खान पुढे येऊन बिश्नोई समाजाची माफी मागणार का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
भाजप नेत्यानेही सलमान खानला आवाहन केले होते आवाहन
याआधी भाजप नेते हरनाथ सिंह यादव यांनीही सलमान खानला बिश्नोई समाजाची माफी मागण्याचे आवाहन केले होते. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “काळ्या हरणाला बिश्नोई समाजाचे दैवत मानले जाते आणि बिष्णोई समाजाकडून त्याची पूजा केली जाते आणि तुम्ही त्याची शिकार केली, त्यामुळे बिष्णोई समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.” भाजप नेत्याने पुढे लिहिले की, बिश्नोई समाजाच्या भावनांचा आदर करत त्यांनी आपल्या मोठ्या चुकीबद्दल बिश्नोई समाजाची माफी मागितली पाहिजे.