(रत्नागिरी)
शहरानजिक हयातनगर येथील चोरीचा छडा अवघ्या ४८ तासात पोलिसांना लावण्यात यश आले. याप्रकरणी रुहिन अजिज हकीम (३७, रा हयातनगर) या संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून रत्नागिरी शहर पोलिसांना चोरीला गेलेला ८२ हजाराचा मुद्देमाल वसुल करण्यात यश आले आहे. न्यायालयाने या महिलेला जामीन मंजूर केला आहे.
शहरातील हयातनगर येथील सोसायटीत बंद फ्लॅटचे कुलूप काढून चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी सफुरा जावेद डांगे (४३, रा. हयात नगर) यांनी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी चक्र फिरवत अवघ्या ४८ तासात शेजारीच राहणाऱ्या रुहिन हकीम या महिलेला अटक केली.
दोन महिन्यापूर्वी रुहीन हकीम या महिलेने डांगे यांच्याकडून त्यांच्या घराचे कुलूप व किल्ली मागून घेतली. मी गावाला जात आहे. माझ्या घराला लावण्यासाठी तुमच्याकडील कुलूप द्या, असे तिने सांगितले. या कुलुपाची डुप्लिकेट चावी बनवून आपल्याकडे तिने ठेवलेली होती.
दि. १३ जून ते १५ जून यादरम्यान डांगे गावाला गेले असता याचाच फायदा घेत रुहिन हकीम हिने डुप्लिकेट किल्लीने त्यांच्या घरात कुलूप उघडून प्रवेश केला व बेडरूममधील ३० हजार रुपयांची एक सोन्याची बांगडी, १६ हजाराचा कानातील जोड, १२ हजारांची चेन असा ८२ हजारांचा मुद्देमाल पळविला होता. १५ जूनला सकाळी डांगे घरी आले असता ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच शहर पोलिस स्थानकात धाव घेत चोरीची फिर्याद नोंदवली. यावेळी डांगे यांनी आपल्या शेजारील बिल्डिंगमधील हकीम या महिलेला दोन महिन्यापूर्वी कुलूप व चावी दिली असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवत अवघ्या ४८ तासात या चोरीचा छडा लावला आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सर्व मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.
रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक महेश तोरस्कर, उपनिरीक्षक शाम आरमळकर व गुन्हे प्रकटीकरण कक्ष यांच्या टीमने ४८ तासातच या चोरीचा छडा लावला आहे. शहर पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.