नागपुरातील कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत खसारा परिसरामध्ये मुलाने आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हे दुहेरी हत्याकांड समोर आले आहे. आपल्या आई वडीलांचा खून केल्याचे त्याने मान्य केले. पण खून का केला? या मागचे कारण ऐकून पोलिसही हादरून गेले. हत्या करणारा मुलगा हा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तर त्याची आई शिक्षिका तर वडील सेवानिवृत्त होते. खून केल्यानंतर या दोघांचेही मृतदेह पाच दिवस त्यांच्या घरात पडून होते.
उत्कर्ष लीलाधर डाखोळे हा आपल्या आई वडील आणि बहीणीसह नागपूरच्या कपिलनगर परिसरात राहतो. २६ डिसेंबरला आरोपीने आई-वडिलांची हत्या केली होती. लीलाधर डाकोडे कोराडी पॉवर प्लांटमधून सेवानिवृत्त झाले होते. तर अरुणा या शिक्षिका होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. तर बहीण कॉलेजला जात आहे.
26 डिसेंबरला दुपारी त्याची आई अरूणा या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका घरी तपासत होत्या. त्याच वेळी उत्कर्ष तिथे आला. त्याने संधी साधत आईचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर तो बराच वेळ त्यांच्या मृतदेहाजवळ बसून वडीलांची वाट पहात होता. संध्याकाळी त्याचे वडील लीलाधर हे घरी आल्यानंतर समोर पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. ते तसेच खाली सोफ्यावर बसले. त्याच वेळी उत्कर्षने कसलाही विचार न करता वडीलांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यातच त्यांचाही मृत्यू झाला. दोघांनाही मारल्यानंतर उत्कर्षने त्यांचे मोबाईल आपल्या ताब्यात घेतले. घराला लॉक लावत तो त्याच्या काकांकडे निघून गेला. बहीणीलाही कॉलेजमधून सोबत घेतले.
आई बाबा बंगळुरूला अध्यात्माच्या कार्यक्रमाला गेले आहेत. ते पाच दिवसांनी येणार आहेत असं त्यांने तिला व नातेवाईकांना सांगितलं. त्याने असं सांगितल्यामुळे कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. बहीण त्याला सतत आई वडीलांबद्दल विचारत होती. पण त्यांना तिकडे फोन वापरण्यास बंदी आहे असं तो तिला सांगत होता. पाच दिवसानंतर म्हणजेच नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्कर्षच्या घरा शेजारी राहणाऱ्या लोकांना त्याच्या घरातून दुर्गंधी येवू लागली. शिवाय काही जण शुभेच्छा देण्यासाठी ही आले होते. त्यांनाही तोच अनुभव आला. घर बंद होते. अशा स्थितीत त्यांनी पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसही घटनास्थळी ताबडतोब पोहोतले. त्यांनी दरवाजा उघडल्यावर त्यांना डाखोळे दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
पोलिसांनी याबाबत चौकशीसाठी उत्कर्षला बोलावलं. त्याची चौकशी करत असताना त्याने गुन्हा कबुल केला. आपणच आपल्या आई वडीलांचा खून केल्याचे त्याने मान्य केले. पण खून का केला? या मागचे कारण ऐकून पोलिस हादरून गेले. उत्कर्ष हा इंजिनिअरिंग करत होता. गेल्या सहा वर्षापासून तो शिकत होता. काही विषयात तो नापास झाला होता. त्यामुळे त्याचे आई वडीस त्याला इंजिनिअरिंग सोड आणि आयटीआय कर असं सांगत होते. शिवाय गावाला जावून शेती कर असा सल्लाही त्याला देत होते. गावाला जाण्यासाठी त्याची बॅगही भरली गेली होती. त्याला एमडी ड्रग्जचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते. आई-वडिलांच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून त्याने आई-वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन आखला. आई वडीलांचे सततचे टोमणे त्याला त्रासदायक वाटत होते. तर एक दिवस वडीलांनी त्याच्यावर हात उचलला होता. हे त्याला अपमानजनक वाटत होते. त्याचबरोबर गावाला गेलो तर नागपूर सुटेल, मित्रमैत्रिणी सुटतील याची भिती त्याला होती. तसं होता कामा नये यासाठी त्याने आई वडीलांनाच संपवण्याचा निर्णय घेतल्याची कबुली आपल्या जबाबात दिली.