(मुंबई)
गोव्याला सहलीसाठी निघालेल्या पोलिसांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका तरुणीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घटना घडली होती. याप्रकरणी देवगड पोलिसांनी सहाही आरोपींना अटक केली. हा प्रकार समजताच वसईतील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. शुक्रवारी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गीते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले.
वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारा पोलीस शिपाई हरिराम गीते (३४) आणि पोलीस शिपाई प्रवीण रानडे (३२) हे आपले मित्र माधव केंद्रे, (३२) श्याम गीते (३२) शंकर गीते (३४) आणि सतवा केंद्रे (३२) यांच्यासह रजा घेऊन गोव्याला खासगी वाहनाने सहलीसाठी जात होते. मंगळवार २४ सप्टेंबर रोजी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एक १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली. पोलीस शिपाई हरिराम गीते याने ‘माझ्या सोबत येते का? तुला वसई फिरवतो असे सांगितले. वाहनातील अन्य पोलिसांनीही या तरुणीची टिंगलटवाळी काढून तिची छेड काढली. ती दुर्लक्ष करून जात असताना त्याने तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी या आरोपींना चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले.
देवगड पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी दोन वसई वाहतूक शाखेतील पोलीस, तर एक जण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) आणि एक जण राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपीएफ) दलात कार्यरत होता.