(रत्नागिरी)
जिल्ह्यातील सुमारे ६६६ संगणक परिचालक गेले पाच महिने मानधनापासून वंचित असताना शासनाने केवळ एका महिन्याचे मानधन जमा करून परिचालकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
जिल्ह्यातील संगणक परिचालकांचे मागील पाच महीने मानधनावाचून वंचित आहेत. गेली सुमारे चौदा वर्षे संगणक परिचलक महिना सात हजार एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. मानधनवाढ व्हावी, यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. डिसेंबर महिन्यापासून संगणक परिचालकांना मानधन देण्यात आलेले नाही. नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात अधिवेशन काळात मानधन वाढवून मिळावे, यासाठी परिचालकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातही असेच आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी मानधन वाढीचे निर्देश दिले होते. पण, प्रत्यक्षात आंदोलनाचा ठपका ठेऊन ठेकेदार कंपनीने परिचालकांना मानधनात कपात केली.
नोव्हेंबर महिन्याचे मानधनही अर्धेच बँक खात्यावर जमा करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्याचे मानधन देणार नसल्याचे कंपांनीकडून सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात संगणक परिचालकांनी आंदोलनानंतर आंदोलन काळातील ऑनलाइन काम पूर्ण केले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींचे मार्च एंडिंगचे काम पूर्ण झाले आहे. आंदोलन केले, कामबंद आंदोलन झाले; पण त्यानंतर कामावर रुजू झाल्यावर आंदोलन काळातील कोणतेही काम बाकी राहिलेले नसताना ही मानधन कपात का? असा प्रश्न परिचालक विचारत आहेत.