(रत्नागिरी)
केंद्र शासनाच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत भोके सब स्टेशन ते निवळी बावनदी अशी पाच किलोमीटरची विद्युत वाहिनी केंद्र शासनाकडून मंजूर झाल्याने या योजनेचे भूमिपूजन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवळी ग्रामस्थ व व्यापाऱ्यांनी खासदारांची भेट घेऊन महामार्गाचे काम करताना ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. ठरावीक व्यावसायिकांसाठी छोट्या व्यापाऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी खा. राणे यांच्यासमोर केला.
कोकणचे नेते आणि खासदार नारायण राणे आणि माजी खासदार नीलेश राणे हे निवळी गावात आलेले होते. या सोहळ्यादरम्यान निवळी मधील व्यावसायिक, व्यापारी यांनी राणे यांची भेट घेतली. यावेळी व्यावसायिक, व्यापारी तसेच ग्रामस्थांनी त्यांच्या अडीअडचणी व कैफियत खासदार राणेंकडे मांडल्या. काही व्यक्तींकडून त्यांचे वैयक्तिक व्यवसायासाठी तसेच फक्त स्वतःच्या विकासासाठी व्यवसायाचे ठिकाण व महामार्ग चौपदरीकरणाचा रस्ता एकसलग उंचीवर ठेवण्याच्या हव्यासापोटी पुढील नियोजित पुलामुळे निवळी बाजारपेठेचे तेथील व्यापारी वर्ग, इतर व्यावसायिक व ग्रामस्थ यांचे मोठे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली. अनेक तक्रारींचा पाढाही व्यापाऱ्यांनी त्यांच्यासमोर वाचला.
गावातील काही स्थानिक ग्रामस्थ ज्यांचे हातावरचे पोट आहे, ते लोक त्या जागी फणस, करवंद, जांभूळ ,ओले काजू हे विक्री करीत आहेत. परंतु या पुलामुळे सर्वसामान्य गरीव ग्रामस्थांना या वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध न झाल्याने भविष्यात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या गोरगरीब जनतेचा, व्यावसायिक, व्यापाऱ्यांचा विचार करता नियोजित ब्रिज वगळून रस्ता सलग बाजारपेठेतून यावा व दुतर्फा असलेली बाजारपेठ वाचवून निवळी व्यावसायिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी खा. राणे यांच्याकडे केली.