(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी नद्यांचे पात्र ओलांडून पाणी बाहेर आले आहे, तर काही ठिकाणी पाणी इशारा पातळीच्या पुढे आहे, काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहे. राजापूर तालुक्यात शिवणे बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेवर भले मोठे झाड कोसळले. शाळेतील शिक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पावसाची संततधार सरीवर सुरू असल्याने सोसाट्याचा वाराही आहे. त्यामुळे वाऱ्यामुळे अनेक वर्षांची झाडे उन्मळून पडत आहे. शिवणे बुद्रुक येथील दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तुफान वारे वाहत होते. या वाऱ्याच्या वेगाने जिल्हा परिषदेच्या शाळेवर भले मोठे झाड थेट वर्ग खोल्यावर कोसळले. शिक्षकांच्या सतर्कमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. प्रचंड पाऊस आणि वाऱ्याचा अंदाज घेता शिक्षकांनी काळजीपोटी सर्व विद्यार्थ्यांना काही मिनिटांपूर्वीच बाहेर काढले होते.
मुलांना बाहेर काढताच झाडाने मोठा आवाज केला. बघताच क्षणी बाजूला असणारे भले मोठे झाड थेट ज्या खोलीत मुले बसली होती, त्याच खोलीवर पडले. शिक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेतून २९ मुले बचावली आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचे दप्तरे व पाण्याच्या बॉटल इतर वस्तू झाड पडलेल्या खोलीतच राहून गेल्या आहेत. मात्र ज्या मुख्याध्यापक प्रकाश शिवराम बाईत, सुनील लक्ष्मीकांत किंद्रे, संजय राजाराम अहिरे या तीन शिक्षकांच्या सतर्कतेमुळे शाळेतील २९ बालके सुखरूप आहेत. तिन्ही शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.