(संगमेश्वर / सचिन मोहिते)
तालुक्यातील देवरुख नजीकच्या साडवली येथे माऊली बालाजी देवरुख ग्रुपच्या वतीने रविवारी दिवसभर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडा गटाच्या स्पर्धेला चांगलीच रंगत आली. स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील खेर्डीच्या सचिन अशोक म्हादे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकात येत चांदीच्या गदेचा आणि ५१ हजार पारितोषिकाचा मान पटकावला आहे.
स्पर्धेत ९८ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन आमदार शेखर निकम व प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत खेर्डीच्या प्रथम क्रमांक सचिन अशोक म्हादे, द्वितीय क्रमांक शाहूवाडी तालुक्यातील आंबा वारूळ येथील दिलीप बाबू दिडे, तृतीय क्रमांक साहिल सुरेश चाळके (चिंचघरी), चतुर्थ क्रमांक प्रेम प्रदीप कदम (आवाशी), तर पाचवा क्रमांक ओंकार चंद्रकांत हुमणे(आगवे) यांच्या बैलगाडीने पटकावला. विजेत्यांना रोख रक्कम, चांदीची ढाल, सन्मानचिन्ह व सहभागी बैलगाडा मालकांस सन्मानचिन्ह देऊन माऊली बालाजी ग्रुपच्या वतीने गौरविण्यात आले.
स्पर्धेप्रसंगी माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सुरेश बने, सुदेश मयेकर, माऊली बालाजी ग्रुपचे अध्यक्ष प्रसन्न सार्दळ, आबा घोसाळे, साडवली सरपंच संतोष जाधव, सूर्यकांत सावंत, उमेश देसाई, राजेश जाधव, पपु नाखरेकर, रमेश पंदेरे, बापू डोंगरे, सुबोध पेडणेकर, रविंद्र सावंत, अजय सुर्वे, मुजीब साटवीलकर, नंददिप बोरुकर उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी माउली बालाजी ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली. हजारो रसिक प्रेक्षक याठिकाणी उपस्थित होते.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन केल्याबद्दल बैलगाडा चालक मालक, रसिक प्रेक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले. एकावेळी पाच बैलगाडा धावण्याच्या स्पर्धा प्रथमच जिल्ह्यामध्ये घेण्यात आली. या चित्तथरारक स्पर्धेला चांगलीच रंगत आली होती. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीत ही स्पर्धा उस्फूर्त वातावरणात पार पडली. देवरूख येथील उद्योजक प्रसन्न सार्दळ यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० पेक्षा अधिक वर्ष हा ग्रूप कार्यरत आहे. देवरूख आणि परिसरातील तब्बल साठाहून अधिक युवकांपासुन सेवानिवृत्त वयोगटातील सदस्य यामध्ये उत्साहाने सहभागी होतात.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1