(मुबंई)
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी एका टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज असून मतदारांनी सक्रिय सहभाग घेत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमा संदर्भात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.
अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. 19 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी अद्याप उपलब्ध असून ऑफलाईन तसेच ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच दि. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. 6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आवर्जुन बजावावा, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी केले.
निवडणूक कार्यक्रमाची रुपरेषा
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 ची अधिसूचना मंगळवार दि. 22 ऑक्टोबर 2024 रोजी राजपत्रात निर्गमित करण्यात येईल. तर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी पर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवार दि. 30 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात येईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवार दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. बुधवार दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी करण्यात येईल. सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. त्याचप्रमाणे राज्यातील लोकसभेच्या 16 – नांदेड या एका लोकसभा मतदारसंघात सुद्धा पोटनिवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिली.
एकूण 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार
राज्यात दि. १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ९७ लाख ४० हजार ३०२ इतकी असून महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख २३ हजार ७७ इतकी तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ हजार ३१ इतकी आहे. आतापर्यंत एकूण ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदारांची नोंदणी झाली असून यामध्ये सन २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. सन २०१९ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण 1 हजार पुरुषांमागे 925 इतके होते. यामध्ये वाढ होण्याच्यादृष्टीने महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आल्याने 2024 मध्ये या प्रमाणात 936 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
सध्याच्या मतदार यादीत १८-१९ वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 20 लाख 93 हजार 206 एवढी आहे. याशिवाय 1 लाख 16 हजार 355 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 12 लाख 43 हजार 192 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांपैकी 47 हजार 716 इतके मतदार 100 वर्षावरील आहेत.
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र. | तपशील | सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार | दि.30 ऑगस्ट, 2024रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील
मतदार |
दि.15.10.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या |
1 | पुरुष | 4,67,37,841 | 4,93,33,996 | 4,97,40,302 |
2 | महिला | 4,27,05,777 | 4,60,34,362 | 4,66,23,077 |
3 | तृतीयपंथी | 2,593 | 5,944 | 6,031 |
एकूण | 8,94,46,211 | 9,53,74,302 | 9,63,69,410 |
मतदान केंद्रात वाढ
सन 2019 च्या तुलनेमध्ये सन 2024 मध्ये राज्यातील मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये 96 हजार 653 असलेली मतदान केंद्रांची संख्या, 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 186 आहे. यामध्ये शहरी मतदान केंद्र 42 हजार 604 तर ग्रामीण मतदान केंद्र 57 हजार 582 आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 हजार 500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आली आहे. तसेच शहरी भागातील मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये एकूण 1 हजार 181 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. तसेच झोपडपट्टी भागात 210 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.
आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इत्यादी किमान सुविधा, प्रसाधन सुविधा, इ.पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत, फक्त मुंबई प्रादेशिक विभागामध्ये उद्वाहन असेल तर वरच्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे.
मतदानाची टक्केवारी
सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
विधानसभा / लोकसभा निवडणूक | पुरूष मतदान (%) | महिला मतदान (%) | तृतीयपंथी मतदान (%) | एकूण (%) |
विधानसभा सन 2014 | 64.33 | 61.69 | 37 | 63.08 |
विधानसभा सन 2019 | 62.77 | 59.26 | 25.48 | 61.1 |
लोकसभा सन 2024 | 63.45 | 59.04 | 25.35 | 61.33 |
यंत्रणेची सज्जता
महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2 लाख 26 हजार 624 मतदान यंत्र, एकूण 1 लाख 26 हजार 911 कंट्रोल युनिट आणि एकूण 1 लाख 37 हजार 118 व्हीव्हीपॅट यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि. 10 सप्टेंबर 2024 ते दि. 9 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली.
प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावरील सोयीसुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात कालपासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. ही आचार संहिता विधानसभा नविन सभागृह स्थापन होण्याची घटनात्मक अधिसूचना प्रसिद्ध होईपर्यंत लागू राहिल. त्यामुळे या कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिरात प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादी बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरिता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.
राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्र सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात करावयाच्या आहेत.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts) याची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.in वर निवडणूक संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
मतदारांसाठी सुविधा
दिव्यांग मतदार (PwDs) :- भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे अॅप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातून तसेच विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम 2024 (दुसरा) च्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबीरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 6 लाख 36 हजार 278 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40 टक्के पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेव्दारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
ही सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. दि.30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. सन २०१९ च्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्यापपर्यंत 69 लाख 23 हजार 199 इतकी वाढ झाली आहे.
प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6 लाख इतके कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हीडिओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणाऱ्या मतदान अधिकारी/कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
मतदारांसाठी उपयुक्त संगणक प्रणाली (IT Application):-
यंदाच्या निवडणूकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने विकसीत केलेली संगणक प्रणाली पुढील प्रमाणे आहे.
सी व्हिजील (c Vigil) :- आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हीजील (c Vigil) हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या अॅपमध्ये छायाचित्र अथवा व्हिडिओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
सक्षम (App) :- पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लीकेशन (IT Application) उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
केवायसी (Know Your Candidate) App :- मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.
इएसएमएस (ESMS App/Portal) – निवडणूक अधिक मुक्त व निःपक्ष वातावरणात व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहेत. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी इएसएमएस (ESMS App/ Portal) वरुन कळविण्यात येत आहे.
1950 क्रमांकाची हेल्पलाईन
राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येईल.
विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – २०२४ दि. 25 जुन 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमाची व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत. विशेष संक्षिप्त पुनःरिक्षण कार्यक्रम (दुसरा) – 2024 अंतर्गत स्वीप उपक्रम :- या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.
परिशिष्ठ 1
दि.15.10.2024 रोजीच्या मतदार यादीतील विविध मतदारांची संख्या
अ.क्र. | तपशील | सन २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदार | दि.30 ऑगस्ट, 2024रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील
मतदार |
दि.15.10.2024 रोजीच्या अद्यावत मतदारांची संख्या |
1 | पुरुष | 4,67,37,841 | 4,93,33,996 | 4,97,40,302 |
2 | महिला | 4,27,05,777 | 4,60,34,362 | 4,66,23,077 |
3 | तृतीयपंथी | 2,593 | 5,944 | 6,031 |
एकूण | 8,94,46,211 | 9,53,74,302 | 9,63,69,410 |
अ.क्र. | मतदारांचा प्रवर्ग | संख्या |
1. | दिव्यांग | 6,36,278 |
2. | सेनादलातील मतदार | 1,16,355 |
3. | 18-19 वर्ष वयोगट | 20,93,206 |
4. | 85+ वर्षावरील जेष्ठ नागरीक | 12,43,192 |