(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण म्हणून हातखंबा तिठ्याची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी “हातखंबा तिठ्यावर प्रचंड खड्डे, हायमास्ट देखील बंद” या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. वृत्त प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला खडबडून जाग आली तात्काळ या भागात काम करणाऱ्या ठेकेदाराकडून खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले. परंतु उपाययोजना केल्या की रस्ता अती धोकादायक बनवला हाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चोवीस तास गाड्यांची वर्दळ असणाऱ्या हातखंबा तिठा परिसरात मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग अशा दोन्ही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु महामार्गाच्या सुरू असलेल्या कामांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना प्रवास करणेच नकोसे झाले आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी स्थानिक आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघातील महामार्गाची पाहणी केली. यावेळी ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर वाहनचालकांना होणारा त्रास कमी होईल अशी सकारात्मक भावना निर्माण झाली. मात्र सामंत यांच्या आदेशाला देखील ठेकेदार कंपनी जुमानत नसल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे.
हातखंबा परिसरात अनेक समस्यांना वाहनचालकांना तोंड द्यावे लागत आहे. या भागातील खड्ड्यांमध्ये बसणाऱ्या दणक्यानी वाहनचालक हैराण झाले होते. नेमकं सांगावं तरी कोणाला? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. या वाहनचालकांच्या समस्येबाबत रत्नागिरी 24 न्यूजच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला खडबडून जाग आली. तत्काळ या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून जेसीबीच्या सहाय्याने मोठ-मोठे खड्डे खडीने बुजवण्याचे काम करण्यात आले.
परंतु नुसतीच खडीची थुकपट्टी लावल्याने गाड्यांच्या वर्दळीने खडी चोवीस तासात अस्ताव्यस्त रस्त्यावर पसरली आहे. या खडीवरून दुचाकीस्वारांना वळण घेताना चाक घसरत आहे. दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता मोठी आहे. रस्त्यावरून दुचाकी चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पादचाऱ्यांना देखील येथून मार्ग काढताना अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खडी टाकण्यात आल्याने रात्रीच्या वेळी हा रस्ता आता अधिक धोकादायक झाला आहे. या खडीमुळे रोगापेक्षा उपाय भयंकर झाला आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात खडी टाकण्याऐवजी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.