(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील कडवई कुंभारवाडी येथील सर्पमित्र व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहिलेले श्रीरंग कुंभार यांनी शेताच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या धामण जातीच्या सापाला जीवदान दिले.
हा भला मोठा साप रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात जाळ्यात अडकलेला होता. सुटकेसाठी प्रयत्न करूनही त्याला बाहेर पडता येत नव्हते. सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या श्रीरंग कुंभार यांना जाळ्यामध्ये सुटकेसाठी तडफडत असलेल्या अवस्थेत साप दिसला. यावेळी तात्काळ आपला मुलगा सर्वेश याला हाक मारून कैची मागवून घेतली. अवघ्या वीस मिनिटांतच अडकून राहिलेल्या सापाला कोणतीही इजा न होता जाळे सावकाश पद्धतीने कापून धामण जातीच्या सापाला मुक्त केले.
त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. श्रीरंग कुंभार हे माखजन न्यू इंग्लिश स्कुल मध्ये ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहेत.त्यांनी या अगोदरही अनेक सापांना जीवदान दिले आहे. साप हा शेतकऱ्यांचा मित्र असून निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करत असतो. सदया गर्मीच्या दिवसात अनेकदा साप घराच्या आजूबाजूला शेतात अथवा रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिसतात .त्यांना न मारता व त्यांचा मार्ग न अडविता त्यांना जाऊ दिल्यास भविष्यात घटत जाणाऱ्या सापांचे अस्तित्व टिकण्यास व त्यांचे रक्षण होण्यास मदत होणार असल्याचे श्रीरंग कुंभार यांनी यावेळी सांगितले.