(मुंबई)
ठाणे शहरातील कळवा भागातील एका २४ वर्षीय एका महिलेने आपल्या बहिणीच्या नवजात बाळाला रस्त्यावर टाकून दिले. रस्त्याने जाणाऱ्यांनी हे बाळ पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही तपासल्यानंतर तांत्रिक आणि गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तिची चौकशी करण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भास्कर नगर येथील चाळीजवळ घडली. रस्त्यावरून जाणाऱ्यांना मुलगी रस्त्यात दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ स्थानिक पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळ गाठून नवजात मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या पालकांचा कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली.
तांत्रिक आणि गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी सहा तासांत मुलीला रस्त्यावर सोडलेल्या महिलेला पकडले. ही महिला त्या मुलीची मावशी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. मुलीला उपचारासाठी नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. या घटनेने स्थानिकांना धक्का बसला असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.