( लांजा )
तालुक्यातील अनेक भागांत रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यांवर देखील खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी सध्याची अवस्था आहे. ते बघून हाच काय शहराचा विकास, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मुंबई गोवा महामार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. लांजा शहरातील रस्ता महामार्गाच्या कामामुळे रखडल्याचे चित्र आहे. यातच आता लांजामधील ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्यावर देखील मोठं-मोठे खड्डे डोकेदुखी ठरत आहे. वेरवली, विवळी, केलंबे, बेनी वडगाव, असगे, कोर्ले फाटा अशा अनेक गावाची रस्त्यांची वाट बिकट झाली आहे. लांजा बाजारपेठ ते गवाने फाटा या सर्विस रोडची बिकट अवस्था पाहायला मिळत आहे. रस्त्यावर डांबराचा थर अजिबात शिल्लक नाही. पूर्णपणे रस्ता उखडलेला असून खडीवरून वाहने चालवावी लागत आहेत. दुचाकीचालकांचे या रस्त्यावर घसरून अपघात झाले आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम सुरू झाले असून लांजा पट्ट्यातील काम धीम्या गतीने का सुरू आहे असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे देखील पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.
याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे लांजामधील कार्यकर्ते संपूर्ण लहान-मोठ्या रस्त्यांची पाहणी करणार आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही तर आंदोलन करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला जागे करू असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे माझी जिल्हा महासचिव प्रशांत कदम यांनी प्रशासनाला दिला आहे.