(संगमेश्वर)
तालुक्यातील देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पांगरी घाटात मंगळवारी सकाळी ८ वाजता दरड कोसळली. या दरडीमुळे काहीवेळ वाहतुकीला अडथळा झाला होता. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ही दरड बाजूला केल्यानंतर साडेतीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली.
पांगरी मार्गे देवरुख हा मार्ग वाहतुकीसाठी सोयीचा असल्याने या मार्गावर वाहनांची कायम वर्दळ असते. बावनदी ते देवरुख मार्गाचे रूंदीकरण केल्यानंतर हा रस्ता चांगल्या दर्जाचा झाला. रुंदीकरणादरम्यान डोंगराची कटाई करण्यात आली आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी घसरण्याचा धोका होता.
क्रशरच्या सुरुंगामुळे दरडीचा धोका कायम
त्याबरोबरच या परिसरात एक मोठा खडी क्रशर आहे. क्रशरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सुरुंगाने डोंगराला सतत मोठे हादरे बसत आहेत. परिणामी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.
या क्रशरमुळे तेथील नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. खुलेआम गाड्या थांबवून सुरुंग लावले जातात. तरी देखील प्रशासनाकडून साधी नोटिशीचा कागद देखील हालत नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना धारेवर धरणारे प्रशासन ठेकेदारांवर इतके मेहरबान का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.