(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील पांढऱ्या समुद्र किनारी रात्रभर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा प्रकार एका घटनेने समोर आला आहे. जिल्ह्यात महत्वाच्या भागात वाळू माफियांचा राजरोस वाळू उत्खननाचा अवैध्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरकारचा लाखो, करोडोचा महसूल बुडवला जात असला तरी जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्यात रस नसल्याचे दिसून येत आहे. मात्र उत्खनन करणाऱ्या माफियांनी उपजिल्हाधिकारी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडल्याने वाळू माफियांचा रात्रभर समुद्रात सुरू असलेला कारभार चव्हाट्यावर आला आहे.
रोज सकाळी रत्नागिरी समुद्रकिनारा हा पूर्णतः शांत असतो. समुद्रकिनारी खळखळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकत अनेक नागरीक सकाळी पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी येत असतात. यातच वाळू माफियांचा देखील रात्री सुरू झालेला अवैद्य वाळू उत्खनन करण्याचा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू असतो. वाळू तस्करांचा सुरू असलेला सर्व प्रकार उपजिल्हाधिकारी हर्शलता गेडाम यांच्यावर हल्लाचा प्रयत्न केल्यानंतर उघड झाला आहे. रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकला आपल्या वेळेनुसार समुद्रकिनारी आल्या. गेडाम यांचा मॉर्निंग वॉक सुरू असताना त्यांना सकाळच्या समुद्राचा फोटो घ्यावासा वाटला, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो क्लिक केला.
दरम्यान याच पांढऱ्या समुद्रात रात्रभर राजरोसपणे सुरू असलेले वाळू उत्खनन हे पहाटेपर्यंत सुरू असल्याचे फोटोत व्हिडिओत कैद झाले. या वाळू तस्करांना आपले फोटो कोणीतरी काढल्याचे समजताच गेडाम यांना थेट त्यांनी विचारले, आमचे फोटो कसे काय काढत आहात? त्यावर मी बीचचा फोटो काढला आहे असे सांगून उपजिल्हाधिकारी गेडाम ह्या तिथून निघाल्या. बहुदा फोटो काढणाऱ्या महिला ह्या उपजिल्हाधिकारी आहेत हे वाळू तस्करांना माहित नसल्यामुळे हल्ला करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
वाळू उत्खनन करणाऱ्यापैकी दोघे हे उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्या समोर आले. तुमचा मोबाईल द्या, कारण तुम्ही आमचे फोटो काढलेत असे म्हणत मोबाईल हिसकावण्याच्या त्यांनी प्रयत्न केला. त्याचवेळी उपजिल्हाधिकारी गेडाम यांनी थोडे मागे सरकून एकाला कराटेची मार्शल आर्टची किक मारून त्याला खाली पाडले, त्याचवेळी दुसऱ्या साथीदाराने उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्यावर वाळूचे फावडे मारण्याचा प्रयत्न केला. गेडाम यांनी आपला जीव वाचवत त्याला देखील बॅक किक मारून खाली पाडले. यावेळी गेडाम यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीचा फोटो घेऊन तिथून पळ काढत आपला जीव वाचवला.
जिल्हाधिकारी वाळू माफियांवर कारवाई करणार का?
या घडलेल्या प्रकाराबाबत पोलीस स्थानकात उपजिल्हाधिकारी गेडाम यांनी तक्रार दाखल केली आहे. परंतु समुद्रात राजरोस वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती हाकेवर असणाऱ्या रत्नागिरी महसूल विभागाला माहीत नाही का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वाळू तस्करांची उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्यावर थेट हल्ल्या करण्यापर्यंत मजल गेल्याने यातून वाळू माफियांचे किती मनोधैर्य वाढत आहे हे दिसून येते. या घटनेवरून आता जिल्हाधिकारी वाळू माफियांवर कारवाई करणार की डोळेझाक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.