(संगमेश्वर)
तालुक्यातील सप्तलिंगी पुलावरुन रिक्षा चालकाचा ताबा सुटून थेट वीस पंचवीस फूट खोल नदीत कोसळून भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात रविवार 12 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडला.
पर्शुराम शिवराम पाताडे (35, रा. वांद्री कुणबीवाडी संगमेश्वर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. तर प्रवासी वैभव खर्डे, दिगंबर सनगरे, अविनाश खापरे हे तिघे जखमी झाले आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास पर्शुराम पाताडे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच-08- एके-5848) मधून आपल्या या तिन मित्रांना घेउन नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला होता. नदीतून आंघोळ करुन परतत असताना सप्तलिंगी पुलावर पर्शुरामचा रिक्षावरील ताबा सूटला आणि रिक्षा उलटून हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना प्रथम वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी नेउन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.