( रत्नागिरी /विशेष प्रतिनिधी )
अनेक महिन्यांपासून मीऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ सुरू आहे. मात्र संथगतीने सुरू असलेल्या या कामामुळे मिऱ्यापासून हातखंबापर्यंत ठिकठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. संबधित रवी इन्फ्रा बिल्ड ही ठेकेदार कंपनी वाहनचालकांच्या जीवाशी खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून शांत बसले आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
हातखंबापासून सुरू झालेले चौपदरीकरणाचे काम हे अजूनही पुर्ण होताना दिसून येत नाही. काम करणाऱ्या ठेकेदार रवि इन्फ्रा कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून हातखंबा परिसरातील सर्विस रोड चिखलमय झाला आहे. तसेच चिखलाच्या रस्त्यांमधील जीवघेणे खड्डे प्रवाशांच्या मुळावर उठले आहेत. या खड्ड्यांची चार ते पाच इंच खोली असून अशा जीवघेण्या खड्ड्यातून वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी केवळ पाहणी करण्याच्या नावाने गाडीतून फिरण्याचा आनंद घेतात की काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ठेकेदार कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे या महामार्गाच्या कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य आणि गैरसोयीमुळे अपघाताचे केंद्र बिंदू तयार होत आहे. रोजच कुठे ना कुठे छोटी मोठी अपघाताची घटना घडत आहे.मात्र दुर्दैवाने जिल्हा प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाला यांचे काहीही सोयरेसुतक नाही.
एक महिन्यापूर्वी ठेकेदार कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्थानिक आमदार उदय सामंत यांनी झापले होते. यावेळी लोकांना त्रास होईल अशी काम करू नका, तातडीने डागडुजी करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु स्थानिक आमदार तथा पालकमंत्र्यांच्या आदेशाला देखील या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हरताळ फासला आहे. विकासाचा घाटच नागरिकांची वाट बिकट करून नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. काँक्रीटीकरणाची कामे अर्धवट अवस्थेत थांबली आहेत. या अर्धवट कामांमुळे अरुंद झालेले रस्ते, त्यांवर पडलेले खड्डे, कमीअधिक उंचीमुळे पाणी साचण्याचे प्रकार आणि वाहतूक कोंडी अशा विविध कारणांमुळे अनेक रस्त्यांवरून वाहने चालवताना चालकांची दमछाक होऊ लागली आहे.
रवी इन्फ्रा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा ढोंगीपणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रत्नागिरी दौऱ्यावर येण्यापूर्वी जीवघेण्या खड्ड्याच्या भागात व धोकादायक रस्त्यावर पांढऱ्या रंगाची लांबलचक रेडियमपट्टी लावण्यात आली, यासोबत रस्त्याच्या दुतर्फा लाल-पिवळ्या पट्ट्याचे रेडियम लावून सूचना फलक देखील चमकवण्यात आले. अन्य वेळेस ठेकेदार कंपनी रस्त्याकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे चित्र पाहायला मिळत असते. मंत्री महोदय रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याचे समताच त्यापूर्वी कंपनीचे इंजिनियर व अधिकारी हे ग्राउंडवर दिसतात. यातून रवी इन्फ्रा बिल्ड या ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांचा ढोंगीपणा उघड होत आहे.