(जाकादेवी /वार्ताहर)
जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी मोठमोठ्या अधिकारी पदावर गेलेली अनेक उदाहरणे सांगता येतील. मराठी माध्यमांच्या शाळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. काही पालकांचा इंग्रजी माध्यमांकडेच अट्टाहास असतो, हा हट्टाहास अपेक्षित नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची प्रगती चांगली होताना दिसत आहे. पालकांनी आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर करण्याची भूमिका खूप चांगली आहे. पण डॉक्टर आणि इंजिनियरसाठीच आग्रह करण्याची गरज नाही. इतरही अशी अनेक क्षेत्र आहेत की विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन त्यांना करियर घडवता येईल. आता आपल्या रत्नागिरीतही अनेक उद्योग येणार आहेत, त्या त्या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ लागणार आहेत. कारागीर लागणार आहेत. त्यासाठी छोटे-मोठे उद्योग करण्यासाठी विद्यार्थ्याला त्याला त्याच्या आवडीप्रमाणे शिक्षण देण्यास पालकांनी उद्युक्त करावे, असे आवाहन रत्नागिरी तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ओरी केंद्र शाळा नं.१ येथील कार्यक्रमात केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओरी नं.१ या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते आले असता विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर गावचे सरपंच सौ.स्वाती देसाई उपसरपंच अनिल घवाळी,तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुधाकर घवाळी ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संकेत उर्फ बंड्या देसाई,शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष वसंत जाधव, माजी अध्यक्ष नंदकुमार देसाई, सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रमिला देसाई, तलाठी सिबॉलकुमार जाधव, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शंकर रामाणे, मुख्याध्यापक धनंजय आंबवकर, पदवीधर शिक्षिका सौ.समिक्षा पवार, रामदास चव्हाण, गणपती पडूळे,ग्रामपंचायत सदस्य कल्पेश गुरव यांसह अनेक ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, हितचिंतक उपस्थित होते.
तहसीलदार राजाराम म्हात्रे बोलताना म्हणाले की ओरी प्राथमिक शाळा ही डिजिटल प्राथमिक शाळा असून या शाळेची प्रगती पाहता खरोखरच एक आदर्शवत शाळा म्हणून आपण पाहतो आहोत.ही शाळा अद्यावत आहे .अधिक अद्ययावत होईल, कारण येथील शिक्षक मेहनती आहेत, शिवाय शाळेला ग्रामस्थ व पालकांचे उत्तम सहकार्य लाभत आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. या शाळेचे विद्यार्थी भविष्यामध्ये आपले चांगले करियर नक्कीच घडवतील, असा त्यांनी आशावाद व्यक्त केला.
यावेळी केंद्रस्तर,बीट स्तर व तालुका स्तरावर विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतर्फे तहसीलदार राजाराम म्हात्रे व उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओरी केंद्र शाळेने काढलेल्या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे व संस्कृती संवर्धनाच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे यशस्वीपणे सादरीकरण केले.