( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे मानेवाडी येथे क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ज्या स्पर्धेची मोठ्या आतुरतेने वाट पाहिली जाते ती गणपतीपुळे प्रीमियर लीग( जीपियल )स्पर्धा दिनांक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत गणपतीपुळे मानेवाडी येथील भव्यदिव्य मैदानावर संपन्न होणार आहे. गणपतीपुळे मानेवाडी येथील श्री चंडिका मित्र मंडळाच्या वतीने यंदा सहाव्या पर्वातील या स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा गणपतीपुळे मानेवाडी येथील भव्य दिव्य मैदानावर नाईट स्वरूपात रंगणार आहे.
या स्पर्धेच्या जय्यत तयारीच्या दृष्टीने या स्पर्धेचे प्रमुख सर्वेसर्वा आणि प्रमुख संयोजक संकेत उर्फ पिंट्या गावणकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सदस्य मोठी मेहनत घेताना दिसून येत आहे. त्यामुळे या स्पर्धेची आता मोठी लगबग सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या स्पर्धेच्या आतुरतेकडे सर्व क्रीडा प्रेक्षकांची लक्ष लागून राहिले आहे.
या स्पर्धेमध्ये एकूण बारा संघ सहभागी होणार असून विविध संघ मालकांद्वारे लिलाव पद्धतीने या स्पर्धेमध्ये खेळाडू घेतले जातात. तसेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या आयपीएल स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेत खेळाडूंचा लिलाव केला जातो त्यामुळे ही स्पर्धा खास आकर्षण मानली जाते. तसेच या स्पर्धेतील दोन आयकॉन खेळाडू स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य ठरते. विविध ठिकाणच्या मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले संघ या स्पर्धेत खेळत असल्याने ही स्पर्धा क्रिकेट प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरते.
या स्पर्धेचे विशेष म्हणजे ही स्पर्धा यू ट्यूब या चॅनलवर लाईव्ह स्वरूपात पाहण्यासाठी दाखिवली जाते. त्यामुळे या स्पर्धेला विविध ठिकाणच्या हजारो क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभतो तसेच दरवर्षी ही स्पर्धा गणपतीपुळे येथे होत असल्याने केवळ गणपतीपुळे पंचक्रोशीच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व क्रिकेट प्रेक्षकांचे लक्ष या स्पर्धेकडे लागून राहिलेले असते. त्यामुळे यंदा देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या स्पर्धेसाठी चार गट केले जाणार चार गटातून प्रत्येकी तीन संघ खेळवले जाणार आहेत.त्यामध्ये विविध संघ मालकांच्या दर्जेदार खेळाडूंचा समावेश असल्याने स्पर्धेचे सर्व सामने खास प्रेक्षणीय ठरतात. तसेच या स्पर्धेचा उद्घाटन आणि सांगता समारंभ खास पाहण्यासारखा असतो त्यामुळे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी क्रिकेट प्रेक्षकांची मोठी तुडुंब गर्दी पाहायला मिळते.एकूणच यंदा देखील दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा मोठ्या दिमाखात आणि सर्वोत्तम विशेष नियोजनबद्ध यशस्वी करण्यासाठी चंडिका मित्र मंडळ गणपतीपुळे मानेवाडी चे सर्व संयोजक या स्पर्धेचे प्रमुख सर्वेसर्वा संकेत उर्फ पिंट्या गावणकर यांच्या नेतृत्वाखाली सज्ज झाले आहेत.