(रत्नागिरी)
रत्नागिरीतील झाडगाव – मिऱ्या मार्गावरील प्रस्तावित नूतन मत्स्यालयाचे प्राथमिक अंदाजपत्रक ३० कोटी रुपयापर्यंत गेले आहे. सिंधुरत्न योजनेंतर्गत हे मत्स्यालय होऊन रत्नागिरीच्या पर्यटनात आणखी वाढ व्हावी, यासाठी सिंधूरत्न योजना समिती सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत, पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाचे अंदाजपत्रक बनवण्यात आले आहे.
झाडगाव-मिऱ्या मार्गावर सध्या मत्स्यालय आहे. या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची तसेच विद्यार्थी वर्गाची मोठी गर्दी असते. हेच मत्स्यालय आता आधुनिक स्वरुपात व्हावे यासाठी सिंधुरत्न योजनेतून भैया सामंत यांनी कार्यवाही सुरू केली. यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनीही पुढाकार घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाला ढोबळ अंदाजपत्रक बनवण्यास सांगितले.
नवीन मत्स्यालयामध्ये सागरी, गोड्या पाण्यातील मासे, पाण्याखालील बोगदा, लॅन्डस्केपिंग रॉकवर्क, वॉटर बोट सुविधा, रेस्टॉरंट, एअर फिश पॉण्डस्चा समावेश आहे. या सर्व कामांचे अंदाजपत्रक ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे झाले आहे. हे मत्स्यालय कार्यरत झाल्यानंतर रत्नागिरीतील पर्यटनात भरीव वाढ होण्यास मदत होणार आहे.