(सातारा)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याचे धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला सातारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजात तेढ निर्माण होईल, अशा भाषेत टीका केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.
किंचक नवले असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नवले याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी किंचक नवले याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल प्रक्षोभक भाषा वापरत त्यांना जीवे मारण्याचे धमकी दिल्याचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसात समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी योगेश सावंत यानेही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल त्यालाही अटक करण्यात आली आहे. तेव्हापासूनच पोलिस मुख्य आरोपीच्या शोधात होते. मात्र, किंचक नवले हा वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. त्यामुळे तो पोलिसांच्या ताब्यात येत नव्हता. मात्र, अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रुज पोलिसांनी त्याला शनिवारी सातारा येथील सदर बाजार येथून अटक केली.