(संगमेश्वर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाले. मात्र, प्रवाशांना उभे राहण्यासाठी निवारा शेड नसल्याने उन्हात उभे राहून प्रवाशांना बससाठी थांबावे लागत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गजबजलेले संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीसाठी तीन कोटी पाच लाख रुपये मंजूर झाले असून, या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारतीच्या प्रतीक्षेत होते. स्वच्छतागृहांसह इमारतीची दुरवस्था झाली होती. संगमेश्वर बसस्थानकाची जुनी इमारत पूर्णपणे पाडण्यात आली असून नवीन कामाला सुरुवात झाली आहे. बसस्थानक उभारणीच्या कामाला आरंभ झाला असला तरीही प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावाकडे येत आहेत. संगमेश्वर बसस्थानकामध्ये मुंबई, पुणे, गोवा, कोल्हापूर, आदी शहरांकडे जाण्यासाठी प्रवासी संगमेश्वर बसस्थानकामध्ये येत असतात.
सद्यःस्थितीत संगमेश्वर बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना थांबण्यासाठी निवारा सोय करणे आवश्यक होते. उन्हाचा कडाका वाढत असल्याने प्रवासी वर्ग हैराण झाला आहे. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये थांबून एसटी पकडावी लागत आहे. आगोटच्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात ग्राहक वर्ग संगमेश्वरला येत असतो. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दोन मजली इमारत असणार
संगमेश्वर बसस्थानक नूतन इमारत सद्यःस्थितीमध्ये दोन मजली असणार असून तळमजल्यावर उपहारगृह, आरक्षण आणि पास कक्ष, पोलिस चौकी, हिरकणी कक्ष तसेच बैठक व्यवस्थेबरोबरच पुरुष आणि महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहे. पहिल्या मजल्यावर पुरुष आणि महिलांसाठी विश्रांती कक्ष उभारण्यात येणार आहे.