(चिपळूण)
शहरातील उक्ताड बायपास ते फरशी दरम्यानच्या मार्गावरील वाशिष्ठी नदीवरच्या एन्रॉन पूल परिसरात नव्याने उभारलेली लोखंडी कमान अज्ञात वाहनाच्या धडकेने पुन्हा वाकली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.
एन्रॉन पूल सन २०२१ च्या महापुरात खचला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदाराकडून गेली दोन वर्षे या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर गतवर्षापासून या पुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली होती.
अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमान उभारण्यात आली आहे. कमान उभारलेल्या परिसरात विजेची व्यवस्था नाही, कसलाही सूचना फलक नाही. त्यामुळे वाहने कमानीमध्ये अडकण्याचे, धडक बसून अपघात होण्याचे प्रकार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एका अपघातात चिपळूण शहराच्या दिशेला असणारी लोखंडी कमान तुटली होती.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी आवाज उठविताच, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा तेथे नवीन लोखंडी कमान उभारली आहे. मात्र, काही दिवसांतच पुन्हा नव्याने उभारण्यात आलेली कमान अज्ञात वाहनाच्या धडकेत वाकली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या कमानीमधून वाहने बाहेर काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.