(छ. संभाजीनगर / प्रतिनिधी)
लाखो सेवेकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद…. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह आणि आनंद… आसमंत दणाणून टाकणारा स्वामी नामाचा गजर आणि जयघोष…. नीटनेटके आयोजन आणि कमालीची शिस्त.. अशा भारलेल्या चैतन्यदायी वातावरणात श्री क्षेत्र वेरूळ येथे भगवान श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिव्य भूमीवर परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या पावन सान्निध्यात राष्ट्रीय सत्संग सोहळा तथा श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन आणि अतिरुद्र पठण सोहळा न भूतो न भविष्यती असा ऐतिहासिक आणि संस्मरणीय झाला.
छत्रपती संभाजीनगरमधील श्री क्षेत्र वेरुळ येथे पौष कृष्ण अष्टमी आज (मंगळवार दि. २१ जानेवारी २०२५ रोजी) राष्ट्र आणि समाजहितासाठी हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. देश आर्थिक महासत्ता बनवा, देशातील जनतेचे सर्व बाजूने संरक्षण व्हावे, जागतिक युद्धजन्य परिस्थिती टळावी, समाजात सर्वत्र सुख-शांती आणि सोहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, समाजात कुठेही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ नये अशा उदात्त हेतूने या सर्वोच्च सेवेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देश विदेशातून आलेल्या लाखो सेवेकरी आणि भाविकांची विक्रमी गर्दी उसळली होती. सेवेकर्यांना संबोधित करताना परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांनी सेवामार्गाचे बहुविध उपक्रम समाज, देश आणि अखिल जीवसृष्टीच्या कल्याणासाठी असल्याचे प्रतिपादन केले.
सेवेकऱ्यानी समाज हितासाठी झटले पाहिजे, त्याकरिता सेवा मार्गाचे अठरा विभाग कार्यरत असून हे सारे विभाग लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी, जनतेला दुःख मुक्त करण्यासाठी आहेत असे त्यांनी नमूद केले. नवी पिढी संस्कारक्षम होण्यासाठी सेवा मार्गाने मूल्य संस्कार विभागाला झुकते माप दिले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. कृषी बद्दलची अनास्था दूर व्हावी, शेतकऱ्यांना कृषी विषयक योग्य मार्गदर्शन व्हावे याकरिता सेवामार्गातर्फे ६ फेब्रुवारी पासून नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सव भरवण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. कल्याणराव काळे, आ. चंद्रकांत पाटील, आ.अर्जुन खोतकर, आ. अनुराधा चव्हाण, माजी खा. चंद्रकांत खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.