(पनवेल)
चोवीस रुपयांच्या G pay व्यवहारामुळे रेल्वे पोलिसांना (जीआरपी) पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अंमलदार यांनी G pay वरून केलेल्या शेवटच्या व्यवहारामुळे पोलिसांनी मारेकऱ्याचा माग काढून मृत पोलीस अंमलदार यांची पत्नी, तिचा प्रियकर यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विजय चव्हाण (५२) असे मृताचे नाव आहे. विजय चव्हाण हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. चव्हाण हे कुटूंबासह नवी मुंबईत राहत होते, १ जानेवारी रोजी चव्हाण यांचा मृतदेह रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आढळला होता. वाशी रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वाशीतील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात चव्हाण यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असता पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मारेकऱ्यांनी हत्या करून अपघात दाखविण्यासाठी मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाती मृत्यू झाल्याचे भासवले.
पोलीस तपास पथकाने हत्येचा तपास सुरू करून रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासले, मात्र मारेकऱ्यांचा कुठलाही मागमूस लागत नव्हता, अखेर पोलिसांनी मृत विजय चव्हाण यांचा मोबाईल फोनमधील शेवटचा कॉल तपासून देखील त्यात अनोळखी किंवा संशयास्पद क्रमांक आढळुन आला नाही. दरम्यान पोलिसांनी चव्हाण यांचे गुगल पे खाते तपासले असता त्यांना गुगल पे चे शेवटचे ट्रांझेक्शन २४ रुपयांचे आढळून आले, चव्हाण यांनी २४ रुपयांचे ट्रांझेक्शन तपासले असता चव्हाण यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री एका भुर्जीपावच्या गाडीवरून भुर्जीपाव खरेदी केला होता. पोलिसांनी भुर्जीपावची गाडी शोधून काढत चव्हाण सोबत कोण कोण होते याची माहिती मिळवली असता चव्हाण सोबत दोन इसम होते अशी माहिती मिळाली.
पोलिसांनी स्टॉल आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज शोधून काढले आणि मृतकासोबत असलेले पुरुष सापडले. त्यानुसार पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना जेरबंद केले. पोलिसांना कळले की, कारमध्ये गळा दाबल्यानंतर, आरोपींनी ट्रान्स-हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली स्थानकांदरम्यानच्या रुळांजवळील झुडपात मृतदेह नेला. पहिली लोकल ट्रेन येईपर्यंत ते जवळपास चार तास तिथे लपून राहिले. ट्रेनजवळ येताच त्यांनी चव्हाण यांचा मृतदेह रुळांवर ढकलून दिला आणि रेल्वेने अपघाती मृत्यू झाल्यासारखे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वेच्या मोटरमनने वेळीच मृतदेहाची दखल घेत रेल्वे नियंत्रणाला सूचना देत ट्रेन थांबवली.
या दोघांच्या चौकशीत विजय चव्हाण यांची हत्या चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (३५) हिचा प्रियकर भूषण निंबा ब्राह्मणे (२९) याने ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विजय चव्हाण यांचा मृत्यू रेल्वे अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी मृतदेह चालत्या लोकल ट्रेनसमोर ढकलला, असे पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले. पूजाला मदत करणारा मामेभाऊ प्रकाश उर्फ धीरज चव्हाण (२३) आणि प्रविण पान-पाटील (२१) या चौघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भूषण निंबा ब्राह्मणे (२९) असून त्याच्यासोबत मृताच्या पत्नीचे संबंध होते आणि ब्राह्मणेचे मित्र प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण (२३) आणि प्रवीण आबा पानपाटील (२१) यांचा समावेश होता. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने आपल्या पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा मास्टर प्लॅन तयार केला. प्रकाशने विजय यांच्या सोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. त्यानुसार सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. त्यानंतर त्यांनी बाजूलाच असलेल्या हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रविण याने गळा आवळून हत्या केली.
चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे ब्राह्मणेसोबत विवाहबाह्य संबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ब्राह्मणेसोबत राहण्यासाठी तिला तिच्या पतीला संपवायचे होते, असे धक्कादायक कारण उघडकीस आले.