(संगमेश्वर)
कोंडगाव जोयशीवाडी येथील सदरेचा माळ येथे कोंडगावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वर आणि साखरपा गावाची ग्रामदैवत श्री जुगाई देवी यांच्या भेटीचा सोहळा रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडतो.
रंगपंचमीच्या दिवशी श्री गांगेश्वर देव तर होळी पौर्णिमेच्या दिवशी या दोन्ही ग्रामदैवत भक्तांच्या भेटीला बाहेर पडतात. यानंतर सदरेचा माळ जोयशीवाडी या ठिकाणी एकत्र येतात आणि भेटीचा सोहळा रंगतो. बहीण भावाची ही भेट असल्याचे जाणकार सांगतात. सुरवातीला ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात या पालख्या नाचविल्या जातात. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. त्यानंतर भावपूर्ण वातावरणात भेट घडून येते.
या सोहळ्याला पंचक्रोशी मधील शेकडो भाविक उपस्थित असतात. यानंतर कोंडगाव गांगेश्वर देव आपली बहीण जुगाई देवीला सोडण्यासाठी वेगाने धावत जातो, हा क्षण पाहताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. या शिमगोत्सव मध्ये या सोहळ्याला अतिशय महत्व आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कोंडगावचे गावकर जोयशी, मानकरी सावंत साखरप्याचे लिंगायत, गुरव, गोवरे तसेच गावातील ग्रामस्थ मेहनत घेतात.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1