(संगमेश्वर)
राज्यातील श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू मा्र्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) मंगळवारी दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घुमले. तर विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित हजारो भाविकांनी शिवहरा.. हर हर मार्लेश्वरचा जयघोष करून सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. दि. ११ रोजी आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरूवात झाली. दि. १२ रोजी रात्री आंगवली मठात (आताचे मार्लेश्वर देवालय) मार्लेश्वर देवाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला. दि. १३ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. याअगोदर देवरूखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले.
पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले. याअगोदर साखरप्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती. सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर मंगळवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे विवाहसोहळ्यापुर्वीचे विधी पार पडले. यानंतर मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला. हा मुहूर्त शक्यतो दुपारनंतरचा काढण्यात येतो. प्रत्यक्षात विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी रायपाटणकर स्वामी, लांजेकर स्वामी यांना मार्लेश्वर मंदिराजवळ आणण्यात आले. त्यांची पाद्यपूजा झाल्यानंतर त्रिपूर उजळण्यात आला.
यानंतर विवाहसोहळ्याला सुरुवात होण्यापुर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले. यानंतर लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करुन विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रथेप्रमाणे आंगवलीचे अणेराव नवरदेवाचा म्हणजेच मार्लेश्वर देवाचा टोप मांडीवर घेवून बसले होते. तर लांजेकर स्वामी यांनी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेतला होता. दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या विवाहसोहळ्याचे पौराहित्य रायपाटणकर स्वामी, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगड, पाटगावचे स्वामी यांनी केले. तर या विवाह सोहळ्याला अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक यशवंत केडगे, ठाकरे गटाच्या नेत्या नेहा माने आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.