(नवी दिल्ली)
भारतीय न्यायदेवतेचा चेहरामोहारा बदलला गेलाय. देशातील न्यायालये, चित्रपट आणि कायदेतज्ज्ञांच्या दालनात डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण आता नव्या भारताच्या न्यायदेवतेचे डोळे उघडले गेले आहेत. तर तलवारीऐवजी संविधानाची प्रत देण्यात आली आहे. त्यामुळे एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान असं नवं रुप न्यायदेवतेला देण्यात आलं आहे. खरे तर काही काळापूर्वी ब्रिटीशांचे कायदे बदलले गेले आहेत आणि आता भारतीय न्यायव्यवस्थेनेही ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे केवळ प्रतीकच बदलले नाही, तर न्यायदेवतेला वर्षानुवर्षे आंधळे बनवणारी पट्टीही आता दूर झाली आहे. साहजिकच आता कायदा आंधळा नसल्याचा संदेश सर्वोच्च न्यायालयाने देशाला दिला आहे. हे सर्व प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी केले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे.
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या सूचनेनुसार न्यायदेवतेची मूर्ती पुन्हा उभारण्यात आली. सर्वप्रथम न्यायाधीशांच्या वाचनालयात मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या आधीच्या मूर्तीमध्ये तिच्या दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. नवीन मूर्तीमध्ये न्यायदेवतेचे डोळे उघडे असून त्यावर कोणतीही पट्टी नाही. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात शिक्षेचे प्रतीक असलेली तलवार होती. मात्र, आता न्यायदेवतेच्या पुतळ्याच्या हातात असलेल्या तलवारीची जागा संविधानाने घेतली आहे. मूर्तीच्या दुसऱ्या हातातील तराजू पहिल्यासारखाच आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांचा विश्वास होता की आता आपल्याला इंग्रजी वारशापासून पुढे जायचे आहे. कायदा कधीच आंधळा नसतो, तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे. तसेच देवीच्या एका हातात तलवार नसून संविधान असावे जेणेकरून ती संविधानानुसार न्याय देतात असा संदेश समाजात जाईल. दुसरीकडे तराजू बरोबर आहे की त्यांच्या दृष्टीने सर्व काही समान आहे. न्यायदेवतेच्या हातामधील तलवार हे हिंसेचं प्रतीक होतं. कोर्ट हे हिंसा नाही तर राज्य घटनेच्या आधारावर न्याय होतो. त्यामुळे दुसऱ्या हातामध्ये तराजू योग्य आहे. जो सर्वांना समान न्याय देतो, असं मुख्य न्यायाधीशांचं मत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार CJI चंद्रचूड यांच्या निर्देशानुसार न्यायदेवतेची मूर्ती नव्यानं बनवण्यात आली आहे. सर्वात पहिल्यांदा न्यायाधीशांच्या ग्रंथालयात या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या न्यायदेवतेचे डोळे उघडे आहेत. त्याचबरोबर डाव्या हातात तलवारीच्या जागी संविधान आहे. तर उजव्या हातात पहिल्यासारखाच तराजू आहे.
न्यायदेवता ही वास्तविक यूनानमधील प्राचीन देवी आहे. तिला न्यायाचं प्रतीक मानलं जातं. तिचं नाव जस्टिशिया आहे. त्याच नावापासून जस्टीस हा शब्द तयार झाला. या देवीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. त्याचा देखील खास अर्थ होता. न्यायदेवता नेहमी निष्पक्ष न्याय करेल हा त्याचा अर्थ होतो. कुणाला पाहिल्यानंतर न्याय एका पक्षाकडं झुकू शकतो. त्यामुळे या देवतेनं डोळ्यांना पट्टी बांधली आहे. यूनानमधून ही मूर्ती ब्रिटीशमध्ये दाखल झाली. 17 व्या शतकात एक इंग्रज अधिकारी ही मूर्ती भारतामध्ये घेऊन आला. तो अधिकारी न्यायालयात अधिकारी होता. ब्रिटीशांच्या कार्यकाळात 18 व्या शतकाच्या दरम्यान न्यायदेवीच्या मूर्तीचा पहिल्यांदा सार्वजनिकपणे वापर करण्यात आला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपण याच न्यायदेवतेचे स्वीकार केला.