(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील रेल्वे स्थानकाचे काम वेगवान सुरू असताना दोन दिवसांपूर्वी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या दणक्याने सुशोभिरकणाच्या कामाला तडाखा बसल्यानंतर आयोजित केलेला लोकार्पण सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आज (दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी) बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र रेल्वेस्थानकाच्या परिसरातील दुभाजकाचे काम अर्धवट स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र या दुभाजकावर प्रचंड झाडांची गर्दी होती. त्यानंतर मध्यभागी दुभाजक साफसफाई करून लोकार्पण कार्यक्रमापूर्वी रंगरंगोटी करण्यात आली. परंतु मध्यभागी असलेला हा दुभाजक महत्वाचा असून त्याची तुटून-फुटून दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. लोकार्पण कार्यक्रमावेळी ही अवस्था असेल तर यावरून कामाच्या दर्जाबाबत आता वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाच्या दणक्याने रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पीओपीचे डिजाइनिंगच्या शीटस धडाधड खाली कोसळून आतील पातळ शिट लोंबकळत होत्या. मागील काही महिन्यात हे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार असल्याने त्याआधी रेल्वे स्थानकावरील या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा उरकून घेण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू केले. यातच लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र स्थानक परिसरातील दुभाजकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. हे तुटलेले-फुटलेले काम दिसू नये यासाठी तिथेच मोठा बॅनर लावण्यात आला. तो बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत होता. या बॅनरमागे घाईघाईत नव्याने केलेलं काम कशा पद्धतीने करण्यात आलेय हे स्पष्ट दिसून येत असल्याने याच कामामुळे आता पूर्ण झालेल्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.