(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथे चौपदरीकरणाचा रोडवरील माती वाहून गेली आहे. रस्ता मोठ्या प्रमाणात खचत आहे. पावसाच्या पहिल्याच दणक्यात महामार्गावर खचण्याचे प्रकार सुरू झाल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
कापडगाव वळणावर मोठ्या प्रमाणात भराव करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. भराव केल्यानंतर काँक्रिटीकरणाची मार्गिका तयार करण्यात आली. भराव केल्यामुळे रस्त्याच्या बाजुस वीस ते तीस फुटांची दरी निर्माण झाली आहे. याच भरावाची माती आता पावसाच्या पाण्याने माती नरम होऊन हळूहळू खचत आहे. यामुळे रस्त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासोबत तयार करण्यात आलेल्या मोऱ्यामध्ये देखील माती जाऊन मोऱ्या पूर्णपणे बुजण्याची शक्यता आहे. एकूणच पाण्याचा निचरा होण्याबाबत आणि ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
अनेक दिवसांपासून येथील माती वाहून जात आहे. कापडगाव वळणावर दोन्ही काँक्रीटकरणाच्या मार्गिका पूर्ण झाल्या आहेत. परंतु या महामार्गावरील महत्वाच्या प्रश्नाकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग लक्ष न देता डोळेझाक करत असल्याने या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ह्या भरावाच्या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा दगडी पिचिंग करण्याची आवश्यकता आहे. मात्र अशी कोणतीच कार्यवाही न केल्याने गेले आठ दिवस झालेल्या किरकोळ पावसानेच रस्त्याचा काही भाग खचून माती वाहून गेली आहे. त्यामुळे मोठ्या पावसाच्या वेळी या ठिकाणचा रस्त्याचा बहुतांशी भाग वाहून गेल्यास रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितहानी होण्यायुर्वी या भागात प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.