( विशेष /प्रतिनिधी )
रत्नागिरी तालुक्यातील थिबा राजा कालीन जागेत बुद्ध विहार उभारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत साडेसात कोटींची घोषणा केली. पालकमंत्र्यांच्या घोषनेनंतर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी) समस्त बौद्ध समाज बांधवांची थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास समिती ट्रस्टच्या वतीने बैठक पार पडली. या बैठकीत बौद्ध बांधवांनी अनेक प्रश्न उपस्थित करत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना निरुत्तर केले होते. यानंतर बौद्ध समाज बांधवांकडून ट्रस्टसह पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता ट्रस्टच्या कार्यकारणीतील एका सदस्याने राजीनामा दिला आहे. या सदस्याने स्थापन केलेल्या ट्रस्टवर आणि पालकमंत्र्यांवर टीकेची झोड उठवत राजीनामा दिला आहे.
सोमवारी, (दिनांक २३ सप्टेंबर २०२४ ) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रत्नागिरी अधीक्षक कार्यालयाच्या ईमारतीचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कम्युनिटी सेंटर ( थिबा राजा कालीन बुद्ध विहार ) उभारण्यासाठी बौद्ध बांधवांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. आयोजित कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी बौद्ध वाड्यामध्ये गाड्यांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र शासनाच्या ताब्यात असलेली येथील जागा समाजाच्या नावे करून देण्यात यावी अशी मागणी बौद्ध बांधवांची आहे. परंतु बौद्ध समाजाची मागणी पूर्ण न करताच पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्रस्टच्या पुढाकाराने समाजाची दिशाभुल करत असल्याने या कार्यक्रमालाच आता बौद्ध बांधवांकडून तीव्र विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या भूमिपूजन कार्यक्रमाची शहरात बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
सदस्याने दिलेला राजीनाम्यात काय म्हटलेय? मुख्य उद्देश पूर्णत्वास गेलेला नाही…
अर्जदार – मुकुंद यशवंत सावंत
विषय – थिबा राजा कालीन बुद्ध विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट मधील कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा बाबत ….
जय भीम!
मी मुकुंद यशवंत सावंत वळके रत्नागिरी आपणास प्रस्तुत अर्जाद्वारे सुचित करतो की मी थिबा राजा कालीन बुद्धविहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीचा कार्यकारणी सदस्य आहे. सदर ट्रस्ट निर्माण करत असताना संपूर्ण बौद्ध समाजाला जे आश्वासन देऊन आपण ट्रस्ट स्थापित केली तो महत्त्वाचा विषय आपण ट्रस्टचे पदाधिकारी विसरून काम करत आहोत. स्थापन करण्याचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की, आपण सर्व धार्मिक संस्था एकत्रित होऊन रत्नागिरी तालुक्यात धम्म गतिमान व्हावा या हेतूने थिबा राजाचे प्रार्थना स्थळ होते. त्या सदरच्या जागेवर महाराष्ट्र शासनाचा अधिकार होता परंतु अशा या ऐतिहासिक जागेचा वापर आपण संपूर्ण समाज गेली काही वर्षे काही धार्मिक संस्था एकत्रित येऊन बुद्ध पौर्णिमा इतर काही धार्मिक कार्यक्रम करत होतो. हि एक चांगली गोष्ट होती की, कोणत्या ना कोणत्या उद्देशाने तालुक्यातील बराचसा समाज एकत्र येऊन चांगल्या प्रकारे धम्माचे काम करत होता. परंतु यात काहीजण राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. कारण मुख्य उद्देश जागा नावावर करणे हा असताना तो पूर्णत्वास गेलेला नाही. कारण समाज सदरची जागा शासनाच्या निकषानुसार घेण्याच्या कुवतीचा नाही हे काही पदाधिकारी यांनी स्वतः ठरवून समाजाला विश्वासात न घेता सदर जागेवर सर्व अधिकार माननीय जिल्हाधिकारी यांना देऊन अखेर ही जागा शासनाच्या ताब्यात ठेवली गेली. आणि त्यावर पालकमंत्री महोदय उदय सामंत यांनीही येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ट्रस्टच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून समाजाला खुश ठेवण्यासाठी झटपट निधीची उपलब्धता करून दिली. या सगळ्या गोष्टीला आम्ही सामाजिक,धार्मिक स्वाभिमान बाजूला ठेवून भारावून गेलोय अशीच काहीशी परिस्थिती आहे. पण भविष्याचा वेध घेता आपण जे काही निर्णय घेत आहोत आणि फक्त राजकीय इव्हेंट साठीच आपण काम करणार असू तर अशा ट्रस्ट बरोबर कार्यकारणीत राहून काम करणे माझ्यासारख्याला शक्य होणार नाही.
कारण या देशात जो धम्म सम्राट अशोका नंतर देशातील मनुवादी विचारसरणीने जवळजवळ संपविला होता असा धम्म बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने आपणाला तो गतिमान झालेला पाहायला मिळतोय. परंतु ही सुद्धा झालेली क्रांती इथल्या मनुवादी विचारांच्या प्रस्थापित लोकांची डोकेदुखी ठरलेली आहे. देशात आपण पाहतोय जो बौद्ध धर्माचा अनेक वास्तू मधून असलेला ठेवा हा विद्रूपीकरण करून धम्म नामशेष करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे आपण सर्वजण पाहत आलेलो आहोत. अन यापुढेही या देशात बुद्ध विहार ही संकल्पना कशा प्रकारे कमी करता येईल ही सुद्धा कूटनीती काही धर्मांध लोकांच्या मनात आहे हे आम्हाला ओळखून राहावे लागेल आजही काही बऱ्याच गावातून असलेली बुद्धविहारे ही शासन दरबारी समाज मंदिरे अशी ओळख निर्माण करून शासनाच्या दप्तरी बुद्ध विहार या नोंदी गायब होत चाललेल्या आहेत. कारण आम्ही सुशोभीकरणाच्या नावावर समाज मंदिर अशा शब्दाचा वापर करून निधी मिळवतोय आणि भविष्यातील अनेक धोके निर्माण करून घेत आहोत अशाच काहीसा हा प्रकार आहे. आणि हा आदर्श आम्ही तालुका,जिल्हा स्तरावरून गावागावात देत असू तर तुमच्या आमच्या पश्चात पुन्हा एकदा गुलामीची चव आम्ही आमच्या पुढील पिढीला देऊन जात आहोत. यात शंकाच नाही त्यामुळे अशा पद्धतीने होत असलेल्या कामाला माझ्यासारखे अनेक विचार स्वीकारत नाही आहेत आणि हि सगळी खदखद आपण दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी लावलेल्या मीटिंग मधून पदाधिकारी व उपस्थित अनेक सभासदांमधून दिसून आली तरीही आम्ही या सर्वाचा विचार न करता क्षणिक आनंद घेत पुढे जात आहोत हे मला मान्य नसून मी माझ्या कार्यकारी सदस्य पदाचा राजीनामा देत आहे…..
आपला धम्मबांधव
मुकुंद यशवंत सावंत