(रत्नागिरी)
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मतदारसंघात पाऊल ठेवले. राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर मिऱ्या- नागपूर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे जनतेला अनेक समस्यांबाबत त्रास सहन करावा लागत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे वेळोवेळी दुर्लक्ष केले आहे.
ठेकेदारांच्या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामामुळे त्याचा नाहक त्रास सर्व सामान्य माणसे, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार यांना करावा लागत असल्याने ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती केली. मिऱ्या-नागपूर महामार्गाशेजारील रहिवाशी, व्यावसायिक यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्यात प्रचंड धुळीचा सामना करावा लागला होता तर आता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखलम झालेले रस्ते, चिखलाचे पाणी थेट घरात येत असल्याने नागरिक व व्यावसायिक हैराण झाले आहेत.
नाणीजपासून अगदी कुवारबावपर्यंत प्रत्येक गावच्या हद्दीत विविध समस्यांचा सामना तेथील नागरिकांना करावा लागत आहे. खेडशी ते हातखंबा भागात कहरच केला आहे. याबाबत अनेक तक्रारी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आल्या होत्या. त्यासंदर्भात तत्काळ कारवाई करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठक घेतली ती बैठक घेऊन त्यानंतर महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी देखील केली. यावेळी ग्रामस्थ, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार यांच्याशी चर्चा त्यांनी केली.
यावेळी जनतेला त्रास होणार नाही असे काम करा आणि ज्या ज्या चुकीच्या कामामुळे जनतेला त्रास होतोय ती कामे तत्काळ सुधारा, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी रवी इन्फ्राबिल्ड कंपनीच्या अधिकारी वर्गाला दिले आहेत. सामंत यांनी दिलेले आदेश ठेकेदार कंपनीचे अधिकारी पाळतात की हरताळ फासतात हेच आगामी सुरू असलेल्या कामातून दिसून येईल.